Fri, Jul 19, 2019 22:18होमपेज › Marathwada › दगडफेक प्रकरणी तरुणांना जामीन

दगडफेक प्रकरणी तरुणांना जामीन

Published On: Aug 05 2018 1:30AM | Last Updated: Aug 05 2018 1:30AMगेवराई : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या दगडफेक व तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अकरा जणांना जामीन मिळाला, दरम्यान या अकरा ही जणांचा येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेवराई येथे मराठा समाजाच्या तरुणांनी दि.25 जुलै रोजी अर्धनग्न आंदोलन करत येथील आ.लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर धरणे धरले होते, तसेच  आ. लक्ष्मण पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी या आंदोलनाला हिंसक लागले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला होता. यावेळी दगडफेक झाली होती.

यानंतर पोलिसांनी शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करत आंदोलनकर्त्यांची धरपकड केली होती पोलिसांनी अटक केलेल्या अकरा जणांना येथील कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी या अकरा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. यानंतर गेवराईत मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला, तसेच येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात या अकरा जणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

दगडफेक प्रकरणी 53 आंदोलकांवर गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले होते. यातील वसंत सुसकर, कृष्ण गळगुंडे, महेश बेदरे, अर्जुन चाळक, शिवनाथ परळकर, सुनील ठोसर, दीपक आतकरे, गोवर्धन घाडगे, स्वप्निल मस्के, गणेश मोळे आणि सचिन मोटे यांना अटक झाली होती. गेवराई न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर 26 जुलै पासून हे आंदोलक जिल्हा कारागृहात होते. शुक्रवारी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. या आंदोलकांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मोफत पुढाकार अ‍ॅड. शहाजी जगताप, कृष्णराव पंडित, मंगेश पोकळे, बाळासाहेब कोल्हे, शहादेव ननवरे, महादेव तुपे, योगेश शेळके, नामदेव साबळे, सचिन आबूज, कल्पेश पवने, काळकुटे, दाभाडे यांनी घेतला.

जामीन मिळाल्याने वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहता आले

गेवराईतील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार गणेश बेदरे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांचे चिरंजीव महेश बेदरे हे देखील आंदोलनातील गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होते. त्यांना वडिलांशी शेवटचे बोलणेही करता आले नाही. वडिलांच्या अंत्यविधीला देखील उपस्थित राहता येईल की नाही याबद्दल शंका होती, मात्र अ‍ॅड. शहाजी जगताप यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे सर्व प्रक्रिया करून महेश बेदरे यांना अंत्यविधीस उपस्थित राहता आले.