Thu, Jun 20, 2019 01:25होमपेज › Marathwada › प्रवाशांच्या सेवेत नवीन शिवशाही दाखल

प्रवाशांच्या सेवेत नवीन शिवशाही दाखल

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 25 2018 9:50PMपरभणी : प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बससेवेने उत्पन्नात वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेत राज्य परिवहन महामंडळाने लांब अंतरावरील प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी ठोस दिशेने पाऊल उचलले आहे. यानुसार लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता परभणीहून मुख्य मार्गावर वातानुकूलित शिवशाही स्लीपर कोच सेवा सुरू होणार आहे. याकरिता परभणी आगारास 2 गाड्या उपलब्ध झाल्या आसून बस सेवेचा शुभारंभ शुक्रवारी रात्री आठ वाजता आ. डॉ. राहूल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या बस दररोज मुंबईला पाठवल्या जाणार आहेत. ती परभणी बसस्थानकावरून सायंकाळी 7.45 वाजता सोडली जाणार आहे. यामध्ये जिंतूर, मंठा, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे मार्गाचा समावेश आहे. लालरंगातील सर्वसाधारण बस आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा देणार्‍या, परंतु अधिक भाडे आकारणी करणार्‍या शिवनेरी बस यामध्ये शिवशाहीचा पर्याय ठेवत महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या शिवशाही बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निमआराम बसच्या तुलनेत शिवशाहीचे काही प्रमाणात अधिक भाडे आहे, परंतु खासगी वाहतुकदारांच्या तुलनेत ते कमी आहे. यामुळे खासगी वाहतुकीकडे गेलेला प्रवासी शिवशाही अवतरल्यानंतर पुन्हा माघारी फिरल्याचे चित्र आहे. सध्या महामंडळाच्या परभणी विभागाकडे 17 शिवशाही बस आहेत. त्यांच्यामार्फत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वातानुकूलित प्रवासाची सेवा दिली जाते. शिवशाही बसने महामंडळाला निमआराम बसच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळत आहे. या बसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आता लांब अंतराच्या प्रवासासाठी झोपण्याची सुविधा उपलब्ध असणार्‍या शिवशाहीची बस उपलब्ध करण्यात आली आहे. लांब अंतराच्या मार्गासाठी परभणी विभागाने 18 स्लीपर कोच बसची मागणी नोंदविल्याची माहिती आहे. यात परभणी आगाराला 2 बस मिळाल्या आहेत.