Wed, Jul 17, 2019 20:31होमपेज › Marathwada › उत्तर पत्रिका जळीत प्रकरण : गटशिक्षणाधिकार्‍यासह पंधरा जणांना नोटीस

उत्तर पत्रिका जळीत प्रकरण : गटशिक्षणाधिकार्‍यासह पंधरा जणांना नोटीस

Published On: Mar 04 2018 7:25PM | Last Updated: Mar 04 2018 7:25PMबीड : प्रतिनिधी

केज येथील गटसाधन केंद्रातील दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका जळाल्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी आणि कर्मचारी यांना बेजबाबदार धरत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर याप्रकरणीचा अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी सांगितले.

गटसाधन केंद्रातील दहावी व बारावीच्या गणित विषयाच्या उत्तर पत्रिकास शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आज (रविवार) दुपारी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांनी गटसाधन केंद्रास भेट देवून पाहणी केली. दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका सिल करून त्या कपाटात ठेवणे गरजेचे होते, मात्र गटशिक्षणाधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे या आगीत उत्तर पत्रिका नष्ट झाल्या. यास जबाबदार धरत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे कलम 3 चा भंग केल्याने गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे सह चौदा जणांना नोटीस बजावल्या असुन नोटीसचा खुलासा तात्काळ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांनी दिले आहेत. 

उत्तर पत्रिका जळीत प्रकरणी शनिवारी रात्री माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली नंतर रविवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी सदरील घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला असुन हा अहवाल विभागीय शिक्षण सचालकासह शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता परिक्षा द्यावी.  - भगवान सोनवणे 

दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका जळीतामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून न जाता उर्वरित परिक्षाचे पेपर द्यावेत. पेपर जळीत प्रकरणी शासन निर्णय घेणार असुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. 

तपास चालु आहे - पल्लेवाड

गटसाधन केंद्रातील जळीत उत्तर पत्रिकांचा पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी जबाब नोंदवणे चालु असल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पल्लेवाड यांनी सांगितले. 

आगीचे कारण अज्ञात

गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांनी केज पोलीस ठाण्यात दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका अज्ञात कारणाने जळाल्याची तक्रार दाखल केली आहे. 

उत्तर पत्रिका सिलावरच प्रश्नचिन्ह

दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका सिल करुन ठेवल्या असल्याचे गटशिक्षणाधिकारी सांगतात मात्र घटनास्थळी जळालेल्या उत्तर पत्रिका पिशवी मध्ये सिल करुन ठेवण्यात आल्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे उत्तर पत्रिकाचे सिल केले होते का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कस्टोडियन पदाचा पदभार सुनील केंद्रे यांच्याकडे

दहावी व बारावीच्या परीक्षेचा कस्टोडियनपदाचा पदभार विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे तर उत्तर पत्रिका जळीत प्रकरणी तहसीलदारांनी गटशिक्षणधिकारी ढवळे यांना नोटीस बजावली आहे. केज येथील गटसाधन केंद्रातील दहावी व बारावीच्या तेराशेवर उत्तर पत्रिका शनिवारी रात्री जळाल्या. गटशिक्षणधिकारी बळीराम ढवळे यांच्याकडील कस्टोडियनपदाचा पदभार तडकाफडकी काढून घेत कस्टोडियनपदाचा पदभार केज गटसाधन केंद्रातील विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे. उत्तर पत्रिका जळीत प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी  यांना सादर करावयाचा असल्याने तहसीलदार अविनाश कांबळे यांनी गटशिक्षणधिकारी बळीराम ढवळे यांना नोटीस बजावली आहे.