Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Marathwada › एमबीबीएस शिक्षण व्यवस्थेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय

एमबीबीएस शिक्षण व्यवस्थेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय

Published On: May 12 2018 1:30AM | Last Updated: May 11 2018 11:59PMसेलू : संतोष कुलकर्णी

प्रादेशिक आरक्षणामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून 70-30 टक्के प्रादेशिक आरक्षण धोरणामुळे मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शासनाने हे प्रादेशिक आरक्षण रद्द करून महाराष्ट्रातील सर्व गुणवान विद्यार्थ्यांना समान संधी द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा विद्यार्थी व पालकांमधून समोर  येत आहे.

नुकतीच नीट परीक्षा पार पडल्या असून  बारावी विज्ञान शिक्षणानंतर विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षण प्रवेशाकडे कल वाढत आहे. या शिक्षणासाठी जातनिहाय आरक्षण आहे. त्याबरोबर महाराष्ट्रात या प्रवेशासाठी मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र अशा तीन विभागात विभागणी केली असून उर्वरित महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या जास्त असल्याकारणाने  70-30 टक्के प्रादेशिक आरक्षणालाही विद्यार्थांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रादेशिक आरक्षणानुसार स्वतःच्या विभागातील विद्यार्थ्यांना 70टक्के जागा असतात व इतर विभागांतील विद्यार्थ्यांना 30 टक्के जागा असतात. त्यामुळे प्रादेशिक आरक्षणाचा हा असमतोल असल्यामुळे मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना एमबीबीएस शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही, ही बाब समोर आली आहे.

किंबहुना मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे महाविद्यालय निवडण्याची संधी मिळत  नाही. या प्रादेशिक आरक्षणाचा सर्वाधिक फटका मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने हे प्रादेशिक आरक्षण रद्द करून गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यात समान संधी हे धोरण लागू करावे, अशी भूमिका विद्यार्थी व पालकांनी घेतली आहे. मात्र या संदर्भात शासनाने विचार न केल्यास  सेलू येथील  महाविद्यालयीन विद्यार्थी संघटना, डॉक्टर, वकील व शिक्षणप्रेमी नागरिक  न्यायासाठी वज्रमूठ आवळणार आहेत.