Wed, Apr 24, 2019 00:00होमपेज › Marathwada › दीड वर्षात 2492 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

दीड वर्षात 2492 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 10:13PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाला महिलांसह पुरुषांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दरवर्षी  उद्दिष्ट दिल्या जाते. गत वर्षी 2 हजार 39 एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी तब्बल 2 हजार 379 महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर चालू वर्षात 113 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये दोन पुरुषांचा समावेश आहे. यात विशेष म्हणजे महिलांच्या 1 हजार 640 या बिनटाक्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे या शस्त्रक्रियेकडे सर्वाधिक कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी काही ठराविक जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात येते. त्यानुसार गत वर्षी 2 हजार 39 शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयासह औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी आणि सेनगाव येथील रुग्णालयास देण्यात आले होते.

यामध्ये शासकीय स्तरावर नियोजन करून औंढ्यात-315, वसमत-877, हिंगोली-934, कळमनुरी-253 तर सेनगाव निरंक अशा एकूण 2 हजार 379 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर चालू वर्षात एप्रिल ते जूनपर्यंत हिंगोली-76 व वसमत-37 अशा 113 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे दीड वर्षात 2 हजार 492 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर हिंगोलीत दोन पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. शस्त्रक्रियेचा विचार करता महिलांच्या तुलनेत पुरुषांनी शस्त्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

गत अनेक वर्षांपासून महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून मिळणार्‍या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, महिलांची जनजागृती करणे, स्तनपान कार्यक्रम तसेच आदी उपक्रमांतून महिलांना आरोग्याविषयी साक्षर करण्याचा प्रयत्न केल्या जातो. दरवर्षी टाके पद्धतीने महिलांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून आधुनिक पद्धतीने   बिनटाक्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

यामध्ये दीड वर्षाचा विचार करता जिल्हाभरात तब्बल 2 हजार 216 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून महिलांचा कल हा बिनटाक्यांच्या शस्त्रक्रियेकडे  वाढला आहेत. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास मागील महिन्यात रुजू झाले आहेत. त्यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचा आढावा घेऊन निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचार्‍यांना सूचना दिल्या आहेत.