Mon, May 27, 2019 10:00होमपेज › Marathwada › स्मार्ट ग्राम प्रस्तावावरून जि.प.त वादळ

स्मार्ट ग्राम प्रस्तावावरून जि.प.त वादळ

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 08 2018 2:02AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्मार्टग्राम निवडीसाठी 31 मार्चची डेडलाईन  पंचायत समितींना दिली होती. पण गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मनमानीमुळे गावपातळीवर याबाबत जनजागृती झाली नसल्याचा उलगडा 7 एप्रिल रोजी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत केला. यानंतर अतिरिक्‍त सीईओंनी या निवडीसाठी मुदतवाढ दिली जाईल असे आश्‍वासन दिले. पण विरोधकांनी संबिंंधतांवर जनजागृती न केल्याप्रकरणी कारवाईची मागणी लावून धरली. 

जिल्हा परिषदेच्या कै.बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ही बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती अशोक काकडे, श्रीनिवास जोगदंड, ऊर्मिलाताई बनसोडे, राधाबाई सूर्यवंशी, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर यांची उपस्थिती होती. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधून गावांचाही विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेली पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना आता बंद करण्यात आली आहे. या योजनेऐवजी आता स्मार्टग्राम नवी योजना सुरू झाली आहे. या योजनेत तालुका व राज्य पातळीवरील गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

यासाठी मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणार्‍या ग्रामपंचायती, पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती, पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती अशी विभागणी केली जाणार आहे. पर्यावरण संतुलित योजनेचे रूपांतर या योजनेत करण्यात आले आहे. योजनेच्या प्रथम स्तरावर ग्रामपंचायतींनी स्वमूल्यांकन करून प्रस्ताव सादर करायचे आहेत. त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून या गावांची तपासणी होणार आहे. तालुकास्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायत द्वितीय स्पर्धेकरिता पात्र राहणार आहे. सीईओंच्या अध्यक्षतेखालील समिती या ग्रामपंचायतींची तपासणी करणार आहे. त्यानंतर प्रथम स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींना दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.पण या निवडीसाठी दिलेल्या डेडलाईनच्या वेळेत तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी पाहिजे त्या प्रमाणात गावपातळीपर्यंत जनजागृती केली नाही असा आरोप विरोधी सदस्यांनी सभागृहात केला. यावरून योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल व या प्रस्ताव दाखल करण्याची वेळ निघून गेली असली तरी आता त्याकरिता वेळ वाढवला जाईल असे आश्‍वासन दिले. बैठकीस राकाँचे गटनेते अजय चौधरी, राजेश फड, भरत घनदाट, विष्णू मांडे, राम पाटील, राजेंद्र लहाने, समशेर वरपूडकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख तालुका पातळीवरील अधिकारी उपस्थित होते. 

Tags : Marathwada, ZP, storm, Smart Village, proposal