Tue, Apr 23, 2019 08:07होमपेज › Marathwada › आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार आता समकक्षता

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार आता समकक्षता

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:32AMपरभणी : प्रतिनिधी

औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्थांमधील व्यवसाय शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना आता इयत्ता दहावी आणि बारावीची समकक्षता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ती देण्याकरिता शासनाच्या वतीने योग्यत्या कार्यप्रणालीची निश्‍चिती करण्यात आली. 

जे विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण आहेत आणि त्यांनी आयटीआयमध्ये ज्या अभ्यासक्रमाची अर्हता दहावी अनुत्तीर्ण असे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले अशांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावीच्या प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरिता क्रेडिटस देण्यात येतील. आयटीआयमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमाची शैक्षणिक अर्हता दहावी अनुत्तीर्ण अशी आहे त्याऐवजी ती यापुढे दहावीच्या गुणपत्रिकेतील बदलामुळे कौशल्य विकासास पात्र असे नमूद केले जाणार आहे. आयटीआयमधील इच्छुक विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी अथवा बारावी प्रमाणपत्र परिक्षेकरिता नोंदणी करता येणार आहे.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या प्रमाणपत्राकरिता जास्तीत जास्त 4 विषयांचे क्रेडिटस घेता येईल.आयटीआयचा व्यवसाय अभ्यास उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे कमाल गुणांचे रूपांतर राज्य मंडळाच्या परीक्षेकरिता कमाल 400 गुणांमध्ये होणार आहे. विद्यार्थी हा दहावी व बारावीकरिता उत्तीर्ण होण्याच्या विषयाच्या गरजेनुसार कमाल 4 व्यवसाय विषयांची (कमाल 400 गुण) निवड दहावी व बारावी समकक्षतेकरीता क्रेडिटस प्राप्तीसाठी करू शकेल. तसेच त्याला दहावीच्या सर्वोत्तम 5(बेस्ट ऑफ फाईव्ह) योजनेचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या आयटीआय अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेतील विद्यार्थ्यास प्राप्त गुणांचे रूपांतर त्याने निवडलेल्या क्रेडीटसप्रमाणे राज्य मंडळातर्फे देण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षक संचालनालयाची राहणार आहे. या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत नियमानुसार आवश्यक दोन भाषा विषय तसेच पर्यावरणशास्त्र व ग्रेड विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. 

ग्रेड विषयाकरिता विद्यार्थ्यांना जवळची शाळा निवडण्याची मुभा राहणार आहे. दहावीची समकक्षता मिळालेला आयटीआयचा विद्यार्थी इयत्ता अकरावीसाठी कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकणार आहे. तसेच बारावीची समकक्षता मिळालेला आयटीआय संस्थेतील विद्यार्थी बारावी एमसीव्हीसी करणार्‍या विद्यार्थ्यांना तद्नंतर ज्या शाखांमध्ये उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेता येतो त्या सर्व शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहे. 

इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआयमधून 2 वषार्र्ंचे व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केले तर त्यांना राज्य मंडळातर्फे घेणार्‍या बारावीची समकक्षता दिली जाणार आहे. तसेच दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआयचे व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास अशांना दहावीची समकक्षता दिली जाणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी राज्यपालांच्या आदेशावरून निर्गमित केला आहे.