Mon, Aug 19, 2019 09:09होमपेज › Marathwada › 2019 मध्ये परळीचा आमदार मीच : धनंजय मुंडे

2019 मध्ये परळीचा आमदार मीच : धनंजय मुंडे

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:04AMपरळी ः प्रतिनिधी

औष्णिक वीज निर्मितीमुळे देशाच्या नकाशावर असलेल्या परळी शहरात आता सौर ऊर्जेची निर्मिती होऊ लागल्यामुळे या भागाची नवी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. या भागातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न मीच पूर्ण करून दाखवेल असा विश्‍वास विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला आहे. 2019 ला या भागाचा आमदार मीच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

परळी तालुक्यातील मलनाथपूर येथे 500 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या 80 मेगावॅट खासगी सोलार पॉवर प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार होते, मात्र हवामान बदलामुळे त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने धनंजय मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. धनंजय मुंडे म्हणाले की, आपल्या भागाच्या विकासासाठी स्वर्गीय पंडितअण्णा मुंडे यांनी कष्टाने तयार केलेली जमीन आपण दिली त्याच बरोबर या भागातील शेतकर्‍यांनी जमिनी दिल्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला आहे.  शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामुळे हा प्रकल्प आला त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जेष्ठ नेते बाळासाहेब आजबे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सी सिरसाट, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखा फड, महेंद्र गर्जे, नरहरराव निर्मळ, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गोविंदराव फड, पंचायत समिती सभापती मोहनराव सोळंके, मार्केटचे सभापती सूर्यभान मुंडे, उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अजय मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन माधव चाटे यांनी तर प्रा. मधुकर आघाव यांनी आभार मानले.

सर्व्हे झाल्यावर आली लोकप्रतिनिधीला जाग

परळी तालुक्यातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न आहे. सिरसाळा भागात त्यासाठी आपण उद्योग मंत्री यांच्या सोबत बैठका घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. हे स्वप्न मीच पूर्ण करेल असा शब्द धनंजय मुंडे यांनी दिला. सर्व्हे झाल्यावर इथल्या लोकप्रतिनिधीला जाग येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. या भागात खासगी साखर कारखाना उभारणीचे काम सुरू असून ते ही लवकरच पूर्ण करू असेही त्यांनी सांगितले.