Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Marathwada › शेकडो बेरोजगारांना गंडविणारा जितेंद्र भोसले गजाआड 

शेकडो बेरोजगारांना गंडविणारा जितेंद्र भोसले गजाआड 

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:50AMगंगाखेड : प्रतिनिधी

भाजपचा महामंत्री असल्याचे भासवून  राज्याच्या आरोग्य विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवत  सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडविणारा जिंतेद्र बंडू भोसले यास गंगाखेड पोलिसांनी जेरबंद केले. भोसलेच्या टोळीने अनेकांना बनावट नियुक्तीपत्र देत गंडा घातला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील चिमणे या गावात राहणारा  जिंतेद्र बंडू भोसले नवी मुंबईतल्या  सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आपले बस्तान बसवून होता.  आरोग्य विभागातील कामगारांची संघटना स्थापना करून तो विभागाच्या कामगाजाशी नियमित संपर्कात होता. कार्य  आरोग्य कामगारांचा नेता झालेल्या जिंतेद्र भोसले याचा राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसोबत संबंध आल्याने वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून बेलापूर परिसरात ओळख निर्माण झाली. आरोग्य विभागात याने आपली छाप व राजकीय नेता म्हणून ओळख निर्माण केल्याने सुरूवातीला आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या बदल्याचे काम करून या विभागात दबदबा निर्माण केला.

शासनाने आरोग्य विभागात कंत्राटी भरती, अनुकंपा कंत्राटी भरतीचे काम हाती घेतले होते. याच संधीचा फायदा घेत कमी वेळात श्रीमंत होण्याचे स्वप्न रंगवित त्याने षड्यंत्र रचले. आपल्या शैलीने अनेकांना भुरळ पाडणार्या जिंतेद्र भोसले याने आरोग्य विभागात नोकरी देण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना गंडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाळे निर्माण करून एजंट तयार केले. आरोग्य विभागातील शासनाचे बनावट जी. आर. तयार करून शासन आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक व सेवक पदाची नोकरभरती करणार असल्याचा संदेश आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील एजंटांमार्फत सुशिक्षित बेरोजगार तरुणांपर्यत पोहचविला.

आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक व सेवक पदासाठी दर ठरवून एजंटांमार्फत असंख्य सुशिक्षित तरुणांकडून लाखो रुपये घेण्यात आले व आरोग्य विभागातील नियुक्तीचा फॉरमॅट तयार करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणीसह अनेक जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश आहे. नियुक्तीपत्र घेऊन आरोग्य विभागात रुजू होण्यासाठी गेलेल्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी संबंधित एजंटास गाठले; पण उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. शिवाय धमकी देत अनेकांना मारहाणही झाली. भाजपचा स्वयंघोषित महामंत्री म्हणून मिरविणारा हा जितेंद्र भोसले राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आलिशान गाड्यांमधून फिरत होता. शिवाय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांसोबत असलेले फोटो दाखवत आपण फार मोठे नेते असल्याचे भासवून अनेकांना दम देत होता.

सुरेश बाबूराव राठोड व साक्षीदार किरण धेनू राठोड यांनी त्याच्याविरोधात गंगाखेड पोलीसात तक्रार नोंदवली. आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक व सेवक पदावर नोकरी लावण्यासाठी त्या दोघांकडून प्रत्येकी 8 लाख 50 हजार असे 17 लाख घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  या तक्रारीवरून गंगाखेड पोलीसांनी तपास करत पहिल्यादा एजंटांच्या व मध्यस्थांच्या मुसक्या आवळल्या. जगदीश शंकरराव कदम, विनोद श्रीराम राठोड, मनोज साहेबराव पवार, मधुकर पांडुरंग भाकरे यांना अटक केल्यानंतर या टोळीचा मुख्य सूत्रधार जिंतेद्र बंडू भोसले असल्याचे निष्पन्न झाले. पोउपनि रवी मुंडे यांनी आपल्या साथीदारांसह सीबीडी बेलापूर नवी मुंबई गाठून टोळीचा मुख्य सूत्रधार जितेंद्र भोसले यास जेरबंद करून गंगाखेड ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक सोहम माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रवी मुंडे, मगरे, पठाण, माने, बोईनवाड, लोखंडे, जोगंदड, वाघ, कांदे  यांनी या कामी मेहनत घेतली. गंगाखेड तालुक्यातील दहा तरुणांकडून नोकरी लावून देतो म्हणून त्याने 65 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.