Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Marathwada › माजलगाव वगळता शंभर टक्के मतदान

माजलगाव वगळता शंभर टक्के मतदान

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:59PMबीड : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोमवारी माजलगाव वगळता जिल्ह्यात शंभर टक्के मतदान झाले. निवडणुकीतील घोडेबाजार आणि फुटलेले गट-तट यांची चर्चा शेवटपर्यंत होत होती. अशा परिस्थितीत आमदार, पक्षाचे नेते यांनी शेवटच्या वेळी दगाफटका होऊ नये, यामुळे स्वत: मतदारांसोबत जात मतदान करून घेतले.

कधी नव्हे तर यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कमालीची रंगतदार ठरली आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवार, पक्ष, मतदार व कार्यकर्ते यांनी निवडणूक निकराने लढविली. बीड जिल्ह्यात झालेले मतदान, पंकजा मुंडे यांनी स्वत: तळ ठोकून केलेली व्यूव्हरचना यामुळे माजी मंत्री सुरेश धस यांनी शंभर ते दीडशे मताने विजयी होऊ, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धक्का काय असतो? ते निकालाच्या दिवशी दाखवून देऊ असा इशारा दिला आहे. या निवडणुकीत टोकाचे आरोप, डावपेच, शह-काट शह झाल्याने निवडणूक प्रचारात रंगत आली होती. निवडणूक अतिशय अटीतटीची झाली असली तरी सोमवारी माजलगाव वगळता जिल्ह्यात शंभर टक्के मतदान शांततेत झाले. 

परळीत 44 पैकी 44 मतदारांनी केले मतदान...

परळी : परळी तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले. 44 मतदान पैकी 44 एवढे मतदान झाले अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष तहसीलदार शरद झाडके यांनी दिली. सोमवारी सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सकाळी सुरुवातीला मतदान धिम्यागतीने सुरू होते, मात्र साडे अकरा नंतर दुपारी दीड पर्यंत 100 टक्के मतदान झाले. मतदाना दरम्यान मतदान केंद्रावर तगडा पोलिस बंदोबस्त असल्याचे चित्र पहायला मिळाले, दरम्यान पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तहसील कार्यालयात मतदान केंद्रावर जाऊन भेट दिली. 

 माजलगावत 35 पैकी 34 मतदान झाले 

माजलगाव : माजलगावात एकूण 35 पैकी 34 मतदान झाले. तहसील कार्यालयात झालेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीसाठी माजलगाव तालुक्यात एकूण 35 मतदान होते. यात जिल्हा परिषद सदस्य सहा, पंचायत समिती सभापती एक, नगरसेवक 27, नगराध्यक्ष एक असे एकूण 35 मतदारांचा समावेश आहे. सकाळी आठ वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतदानाला सुरुवात झाली. यावेळी मतदान केंद्राच्या बाहेर राष्ट्रवादी, भाजपचे नेते तळ ठोकून बसलेले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत तालुक्यातील एकूण 35 मतदानांपैकी 34 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगर पालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक विजय अलझेंडे यांच्यावर गुन्हा दाखल असून ते फरार असल्याने त्यांचे मतदान झाले नाही.

आष्टीत शांततेत मतदान

आष्टी ः तालुक्यातून एकूण 27 मतदारांनी सोमवारी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नगरपचायतचे 19, जिल्हा परिषद सदस्य 7 तर पंचायत समिती सभापती 1 असे एकूण 27 मतदारांनी आपले मतदान नोंदविले. माजीमंत्री सुरेश धस यांच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतमध्ये एकूण 16 नगरसेवक, आ. भीमराव धोंडे गटांचे दोन तर अपक्ष एक असे 19 मतदार आहेत. जि. प. सदस्य हे 7 तर पंचायत समिती सभापती अशी एकूण बेरीज 27 मतदारांची आहे. सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर उमेदवार सुरेश धस यांनी मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार होत्या. प्रथमतः त्यांनीच मतदान करून मतदान प्रक्रियेला सुरुवात केली.

प्रकाश सोळंके तळ ठोकून

माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत ऐनवेळी दगाफटका झाल्याने दूध पोळाल्याने ते आता ताकही फुंकून पीत आहेत. या निवडणुकीतही काही दगाफटका होऊ नये, यासाठी ते स्वत: मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या मतदारांकडून जातीने मतदान करून घेतले.   

अलझेंडेनी बजावला नाही हक्क

माजलगाव येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय अलझेंडे यांच्यावर परिवर्तन मल्टिस्टेट बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. पोलिसांच्या भीतीने त्यांनी सोमवारी मतदानाचा हक्कही बजावला नाही.

आमदार, नेते केंद्रावर

मतदारांनी मतदान करावे, ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील आमदार, पक्षाचे नेते, आघाडीचे नेते यांनी आपल्या मतदारांसोबत जाऊन मतदान करून घेतल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रावर दिसून आले.या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून विविध अंदाज वर्तवले जात आहे. कोणता गट कोणत्या उमेदवारासोबत आहे याची चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत सुुरु होती.

 लक्ष्मीदर्शनाची चर्चा  

निवडणुकीत सुरुवातीपासूनच लक्ष्मीदर्शनाची चर्चा जाहीर होत आहे. त्यामुळे प्रचारातही हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता.  काहींना लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती. शेवटच्या क्षणी देखील  काहींना अचानक लाभ झाल्याची चर्चा जोरात होती.मात्र बहुतेक जण ही फक्त चर्चा असल्याचे ठासून सांगत होते.त्यामुळे निकालाच्या दिवशी काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

गेवराईत चोख बंदोबस्त

गेवराई :  प्रतिनिधी

सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली होती, दरम्यान तालुक्यातील नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य अशा एकूण 32 मतदारांपैकी सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावल्याने तालुक्यात 100 टक्के मतदान झाले. यासाठी येथील नगरपरिषद कार्यालयात मतदान केंद्र असल्याने सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. यावेळी पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करून चोख बंदोबस्त बजावला.