Wed, May 22, 2019 15:20होमपेज › Marathwada › पाच योजनांवर 13 कोटी 78 लाख निधीचा खर्च

पाच योजनांवर 13 कोटी 78 लाख निधीचा खर्च

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:30PMपरभणी : प्रदीप कांबळे

मानव विकास मिशनच्या योजनांची अंमलबजावणी करून जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा नियोजन मानव विकास विभागाने 2017-18 मध्ये पाच योजनांसाठी प्राप्‍त 13 कोटी 78 लाख 78 हजार रुपये निधी खर्च केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थींनी व मागासवर्गीय पात्र महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे. 

राज्यातील 12 अतिमागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता 29 जून 2006  ला मानव विकास मिशनची स्थापना करण्यात आली. त्यानंतर  2011-12 पासून 22 जिल्ह्यांतील 125 तालुक्यांपर्यंत मिशनची व्याप्‍ती वाढविण्यात आली. यात परभणी सह इतर 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात तेव्हापासून  मिशनच्या योजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. 2017-18 मध्ये गाव ते शाळा विद्यार्थिनींच्या बससेवेसाठी 63 बस सुविधेसाठी 4 कोटी 4 लाख 52 हजार रुपये,  जिल्ह्यातील  3 हजार 738 विद्यार्थिनींना सायकलींसाठी 1 कोटी 12 लाख 14 हजार रुपये,  9 ठिकाणी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक गोष्टींची प्रयोगात्मक माहिती होण्यासाठी बालभवन विज्ञान केंद्र तयार केले.

यासाठी 5 लाख 69 हजार रुपये, 195 अभ्यासकांसाठी 7 लाख 2 हजार 720, 7 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांसाठी 1 कोटी 6 लाख 55 हजार रुपये,  जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत दर महिन्याला दोन आरोग्य शिबिराकरिता 1 कोटी 20 लाख रुपयेे,  अ.जा.-अ.ज.- दारिद्य्ररेषेखालील गरोदर महिलेला बुडीत मजुरीपोटी 800/रुपये, गरोदरपणातील नवव्या महिन्यात 6 हजार 302 महिलांना 2 कोटी 64 लाख 55 हजार 350 रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. अशा प्रकारे  2017-18 मध्ये 13 कोटी 78 लाख 78 हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात माती परीक्षण केंद्राकरिता मानव विकास अभियानांतर्गत दोन वाहने, 1 वनामकृवि परभणी व 1 कृषी विज्ञान केंद्र परभणीस दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक सुविधांची उपलब्धता होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लाभाच्या दृष्टिकोनातून मानव विकास अभियानाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती साधण्यात येत आहे. शिवाय मागासवर्गीय गर्भवती मातांना आर्थिक अनुदान मिळाल्याने मातांचे आरोग्य सदृढ राखण्यास मदत झाली आहे.