Sun, Aug 18, 2019 15:00होमपेज › Marathwada › परभणी शहरात लवकरच मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह : लोणीकर

परभणी शहरात लवकरच मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह : लोणीकर

Published On: Aug 05 2018 1:30AM | Last Updated: Aug 04 2018 11:18PMपरभणी : प्रतिनिधी

मराठा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरामध्ये एकूण 200 मुले व दीडशे मुलींसाठी महिनाभरात वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल,असे प्रतिपादन  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विस्तारित योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लोणीकर यांनी 3 ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भेट दिली. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्यासह विद्यापीठामधील इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अण्णासाहेब शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.इंगोले, प्राचार्य डॉ. डी.एन.गोखले, कुलसचिव डॉ.लोंढे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे उपस्थित होते.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा न होता काही इमारती तात्पुरत्या स्वरूपात अधिगृहीत करून तत्काळ मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विद्यापीठ परिसरातील वसंत वसतिगृहावर दोनशे मुले तसेच वसुंधरा वसतिगृहामध्ये पन्नास मुली व शेतकरी निवासच्या जागी शंभर मुलींच्या वसतिगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.या दृष्टीने सा.बां. विभागाने इमारतींच्या सुविधा व सुसज्जतेसाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महिनाभरात वसतिगृह सुरू करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले .