होमपेज › Marathwada › श्रेष्ठत्वाची भावना समूळ नष्ट झाल्यास वंचितांचा सन्मान

श्रेष्ठत्वाची भावना समूळ नष्ट झाल्यास वंचितांचा सन्मान

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 9:52PMपरभणी : प्रतिनिधी

भारतीय लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा हा समुदाय आहे. त्यामुळे लोकशाहीचे समाजीकरण व्हायला हवे. यासाठी समाजव्यवस्थेचे परिवर्तन होणे आवश्यक आहे. यासाठी श्रेष्ठत्वाची भावना समूळ नष्ट करून समता प्रस्थापित केल्यास देशातील वंचितांचा सन्मान होऊन समताधिष्ठित समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदिवासी, ओबीसी, भटक्या विमुक्‍त व अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासंदर्भात अ‍ॅड. आंबेडकर हे राज्याचा दौरा करीत आहेत. 18 जुलै रोजी येथील बी. रघुनाथ सभागृहात झालेल्या वंचित बहुजन समाज आघाडीच्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले. यावेळी माजी आ. लक्ष्मण माने, ओ. बी. सी. व धनगर समाजाचे नेते माजी आ. हरिदास भदे, माजी आ. विजय मोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण कनकुटे, गणपत भिसे, विनायक काळे, कॉ. किर्तीकुमार बुरांडे, डॉ. सुनील जाधव  यांच्यासह  बहुजन सामाजिक पक्ष, संस्था, राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, सद्यःस्थितीला सत्तेवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार एखाद्या हुकूमशहाप्रमाणे देशाचा कारभार पाहत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप हुकूमशाही वृत्तीने लोकशाहीला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची मुख्य जबाबदारी असताना शेतकरी आत्महत्या रोखल्या जात नाहीत. देशात जातीवर आधारित राजकारण ही सगळ्यात मोठी अडचण आहे. शेतकर्‍यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे त्यांच्याच जातीचे असतात आणि एकदा निवडून आले की त्यांच्याकडे पाहतही नाहीत. त्यामुळे शेतकरी जोपर्यंत जातीला महत्त्व देईल तोपर्यंत त्याच्या वाट्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. हीच स्थिती वंचितांची आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. सूत्रसंचालन कॉ. किर्तीकुमार बुरांडे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण कनकुटे यांनी मानले.

देशात सरकार खासगीकरण करीत आहे. प्रत्येक क्षेत्रातील सवलती काढून घेत आहे. त्यामुळे गरिबीत होरपळणार्‍या वंचितांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्‍न तसेच राहत आहे. यामुळे वंचितानांही शेतकर्‍यांसारखी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.