Thu, Jul 18, 2019 21:01होमपेज › Marathwada › बंदोबस्तानंतर होमगार्डस्ना केला जातो जय महाराष्ट्र!

बंदोबस्तानंतर होमगार्डस्ना केला जातो जय महाराष्ट्र!

Published On: Sep 07 2018 1:08AM | Last Updated: Sep 07 2018 1:08AMअंबाजोगाई  : रवी मठपती 

अंगात खाकी वर्दी, हातात काठी. तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातून अवघे अडीच ते तीन महिने काम दिले जाते. ज्यांच्या सहकार्याने बंदोबस्त यशस्वीपणे पार पाडला जातो, त्या होमगार्डसच्या व्यथा अत्यंत वाईट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून होमगार्डसच्या मागण्यांबाबत शासनाने कानावर हात ठेवले आहेत. 

अंबाजोगाई तालुक्यात एकूण दोनशे पंधरा होमगार्ड आहेत. कुठलाही बंदोबस्त असला की, पोलिस यंत्रनेकडून होमगार्डसला पाचारण करण्यात येते. कधी बोलावले जाणार याची बिचार्‍या होमगार्डला काडीचीही कल्पना नसते. मोबाइलवर एसएमएस आला की कधीही, केव्हाही  निघायचे. वर्षातून दोन ते तीन महिने कामाचे भरतात. कामाच्या मोबदल्यात  तुटपुंजे मानधन दिले जाते. तीनशे रुपये मानधन व शंभर रुपये भत्ता. एवढ्यावरच आम्ही पोट भरायचं कसं? असा प्रश्‍न तमाम होमगार्डस् समोर आहे.  होमगार्ड असूनसुद्धा आम्हाला अभिमान बाळगता येत नाही. ओळख लपवत वेठबिगारी म्हणून कामावर जावं लागते. अशी व्यथा एका होमगार्डने सहज भेटी दरम्यान सांगितली. 

मिळालेल्या चारशे रुपयोपैकी दोनशे रुपये प्रवासात, नाष्टा, पाण्यात  जातात. उरलेल्या दोनशे रुपयांवर समाधान मानावे लागते. वर्षभरातून अवघे अडीच तीन महिने काम भेटत असल्याने प्रंपच भागत नाही. इतर कामे शोधावी लागतात. त्यामुळे कोणी बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून जातो, तर कोणी दिवस रात्र रिक्षा चालवतो. पान टपरी चालवतो. कोणी किराणा दुकानात तर कोणी पिठाच्या गिरणीत मजूर म्हणून काम करताना दिसतो.

साहित्यही मिळत नाही

सुरक्षेसाठी कडक सूचना देऊन तैनात केले जाते; पण हातात साधी काठीही दिली जात नाही. मग आमचा वचक राहणार कसा? गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवणार कशी? त्यामुळे आम्हाला समोरच्या व्यक्तीला दादा-भाऊ म्हणत परिस्थिती सांभाळावी लागते. काठीच नव्हे, सरकारने पाठविलेले गणवेश, बूट असे साहित्यही आमच्यापर्यंत पोहोचत नाही. नेमणूक झाल्यानंतर जो गणवेश मिळाला होता, तोच गणवेश अजूनही अंगावर आहे. तीन वर्षांतून एक गणवेश मिळेल, असा नियम आहे; पण तो दुर्दैवाने कागदावरच असल्याचे व्यथीत होऊन होमगार्डने सांगितले.  शासन भविष्यात काही तरी चांगला निर्णय घेईल. आम्हाला सेवेत कायम करेल या आशेवर आम्ही होमगार्ड म्हणून काम करतो आहोत. असेही यावेळी ते म्हणाले. शासनाच्या विविध विभागांकडे मानधनावर काम करणारे कर्मचारी काय सेवेत आले आहेत, परंतु होमगार्डबाबत मात्र अद्याप असा निर्णय झालेला नाही.