होमपेज › Marathwada › आजच्या ‘हिरकणी’समोर अनास्थेचा बुरूज

आजच्या ‘हिरकणी’समोर अनास्थेचा बुरूज

Published On: Aug 05 2018 1:30AM | Last Updated: Aug 05 2018 1:30AMबीड : उदय नागरगोजे

सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयांमध्ये येणार्‍या बालमातांना स्तनपान देणे सोयीचे व्हावे यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले होते. शासनाचा हा अतिशय चांगला उपक्रम असला तरी बीडमध्ये जिल्हााधिकारी कार्यालयासह एकाही शासकीय कार्यालयात हा कक्ष सुरू नाही. काही कायार्र्लयात कक्षच नाही तर काही ठिकाणच्या कक्षाची दुरवस्था झाली आहे. प्रत्येेक शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणचे हे भीषण वास्तव आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात रायगडावरून उतरलेल्या हिरकणीसमोर दगडधोंडे, झुडपांसह भला मोठा कडा होता. आजच्या हिरकणींसमोर प्रशासकीय उदासिनता आणि अनास्थेचा बुरूज उभा राहिला आहे.

बसस्थानकातील कक्षात कचर्‍याचा ढीग

येथील बसस्थानकात चौकशी कक्षाच्या बाजुलाच ‘हिरकणी कक्ष’ आहे. कक्षाच्या दर्शनी भागात नवाकोरा बोर्ड पाहून येथे स्तनपाणासाठी उत्कृष्ट सोय असेल असे वाटते, मात्र कक्षाचे नादुरुस्त दार ढकलून आत डोेकावल्यास आतमध्ये बालमातांसाठी कसलीच सुविधा नसल्याचे दिसले. कचर्‍याच्या ढिगामुळे या हिरकणी कक्षाचा अक्षरश: उकीरडा झाला आहे. धुळीचे साम्राज्य, प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचर्‍याचा ढीग आतमध्ये साचलेला आहेत. या ठिकाणी येणार्‍या महिलेला बसण्यासाठी एखादा बेंच असणे तर दूरच गेले कित्येक महिने या ठिकाणी झाडूही मारला नसल्याचे आढळून आले. 

कुलूपबंद कक्षासमोर ग्रंथालयाचा बोर्ड

जिल्हाधिकारी कार्यालयातून शासनाच्या सर्व योजना जिल्हाभरात राबवल्या जातात. योजना राबवण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात हिरकणी कक्ष एकदम व्यवस्थीत असेल असे वाटले. नव्यानेच झालेल्या इमारतीत प्रवेश केल्यानंतर हिरकणी कक्षाबाबत एका कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता त्यांनी तहसीलदारांच्या केबीनकडे बोट दाखवले.

तहसीलदारांकडे विचारणा केली असता प्रारंभी त्यांनी ‘ही इमारत नव्यानेच झाली आहे, शेजारी दुसरी एक नवी इमारत होणार आहे, त्यात व्यवस्था केली जाणार आहे. तसा प्रस्ताव पाठवला आहे. असे शासकीय भाषेेतील उत्तर दिले. शासनाच्या आदेशाविषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी हो, जुन्या इमारतीत असा एक कक्ष होता, तुम्ही बघा असे सांगितले. त्यावर त्यांना कक्ष बघण्यासाठी कोणाला पाठवता येईल का?’ असे विचारल्यानंतर त्यांनी फोनवरून दुसर्‍या एका कर्मचार्‍याला सदरील कक्षाबाबत विचारणा केली. त्या कक्षाला कुलूप असून चावी कोणाकडे आहे, ते माहीत नाही असे उत्तर समोरून मिळाले, दरम्यान तहसीलदारांना कक्ष दाखवण्याची विनंती केली असता त्या स्वतःहून कक्ष दाखवण्यासाठी सोबत आल्या. प्रत्यक्ष पाहणी केली असता कक्षासमोेर चक्क ग्रंथालयाचा बोर्ड आढळूून आला. 

तहसीलदार यांनी आत एक रूम आहे, तेथे स्तनदा मातांसाठी चांगली सोय केली आहे. पण चावीच नसल्याचे सांगितले. चावीच नसल्यामुळे आत ग्रंथालय आहे की हिरकणी कक्ष? या प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकले नाही. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले. याप्रश्‍नी संबंधितांनी कारवाई करणे गरजेचे आहे.