Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Marathwada › हिंगोलीत रमजाननिमित्त बाजारपेठ फुलली

हिंगोलीत रमजाननिमित्त बाजारपेठ फुलली

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:09PMहिंगोली : प्रतिनिधी

रमजान महिना सुरू असून रमजान ईद जवळ आल्याने हा सण साजरा करण्यासाठी विविध वस्तू खरेदी केल्या जातात, यात कपडे, साड्या, बांगड्या, शूज, चप्पल आदी वस्तूंचा समावेश असून विक्रेत्यांनी बाजारात त्याची दुकाने थाटली आहेत. ते खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहेे.

रमजान महिना सुरू असून या महिन्यात महिनाभर रोजे केले जातात. तसेच या महिन्यात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असल्याने तो दिवस साजरा केला जातो. यात शब-ए-कद्र बडीरात उत्साहात साजरी करून रात्रभर कुराणाचे पठण केले जाते. तसेच अन्नदान देखील केले जाते. या महिन्याचा शेवट रमजान ईदने केला जातो. हा दिवस मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यासाठी विविध वस्तू खरेदी केल्या जातात. यात रेडिमेड कपडे, साड्या, बांगड्या, शूज, चप्पल यासह विविध वस्तूंचा यात समावेश आहे. सध्या बजारात ईद जवळ आल्याने विक्रेत्यांनी या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. रेडिमेड कपड्यात जिन्स, टी-शर्ट, सहाशे रुपयांपासून ते पंधराशे रुपयांपर्यंत उपलब्ध झाले आहेत.

साड्यामध्ये नेट, सिंथेेटिक, सिमर,  जार्जेट, प्लेन, काठा पदराची साडी आदी साड्यांचा यात समावेश आहे. त्या पाचशेपासून तीन हजार रुपये किमतीपर्यंत उपलब्ध झाल्या असल्याचे विक्रेते सांगत आहेत. मुलींसाठी पंजाबी ड्रेस, डे्रस मटेरिअल पाचशेपासून दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध झाले आहेत.  तसेच शूजमध्ये विविध प्रकारचे शूज आले असून ते एक हजारांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत आहेत. तर चप्पल देखील शंभरापासून ते पाचशे रुपयांपर्यंत आहेत. बांगड्या चाँदसेट, मॅचिंग, फॅमेली सेट, फॅन्सी फायबर सेट, जेम्बोसेट देखील वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणार्‍या बांगड्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या तीस रुपये डझनपासून ते पाचशे रुपयांपर्यंत उपलब्ध झाल्या आहेत. यासह इतरही वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या असून प्रत्येक दुकानांवर खरेदीसाठी गर्दी होत आहे.  तसेच शिरखुर्म्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. प्रामुख्याने महिला वर्ग खरेदीसाठी बाजारात येत असल्याचे चित्र आहे.