Sun, May 26, 2019 21:06होमपेज › Marathwada › हिंगोलीच्या जंगलात साडेतेराशे प्राणी

हिंगोलीच्या जंगलात साडेतेराशे प्राणी

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 10:32PMहिंगोली : गजानन लोंढे

जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांची संख्या किती आहे? यासह वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी वावरतात, यासाठी वन विभागाच्या वतीने 30 एप्रिल रोजी पौर्णिमेला ट्रॅप कॅमेर्‍या पद्धतीने वन्यजीव गणना करण्यात आली. या गणनेत जिल्ह्यातील जंगलात तब्बल 1349 वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रानडुक्‍कर व निलगायींचा समावेश आहे. विशेष म्हणजे दुर्मिळ असे तडसही प्रगणनेत आढळले आहेत.

जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण मोठे आहे. जिल्ह्यात एकूण चार क्षेत्रांत वनविभागाचे विभाजन करण्याात आले आहे. यामध्ये हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव विभागांचा समावेश आहे. या चारही विभागांत बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावर्षी वनक्षेत्रातील पाणवठ्यावर 1 हजार 349 वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी आल्याच्या नोंदी कॅमेर्‍याने टिपल्या आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी वन विभागाच्या वतीने वन्य प्राणी प्रगणना करण्यात येते. जिल्ह्यातील 40 पाणवठ्यांवर ही गणना ट्रॅप कॅमेर्‍या पद्धतीने करण्यात आली. यामध्ये भेडकी, चितळ, हरिण, रोही, वानर, कोल्हा, रानडुक्‍कर, मोर, तडस, रानमांजर, काळवीट, ससा व इतर प्राणी आढळले. हिंगोलीच्या जंगलात प्रामुख्याने रानडुक्‍कर व निलगाय तसेच हरणांची संख्या मोठी असल्याचे गणनेत समोर आले आहे. 323 रानडुक्‍कर, 627  निलगाय, तसेच 81 हरण, 21 काळविटांची नोंद झाली. मागील काही वर्षांत रानडुक्‍कर व निलगायीच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याच्या नोंदी वन विभागाने नोंदविल्या आहेत, तर इतर रानमांजर, बिबट, वाघ, सायाळ, मसन्या ऊद, रान कुत्रा, अस्वल, चौशिंगा यांसारखे प्राणी जंगलात हद्दपार झाल्याचे चित्र गणनेतून समोर आले आहे.

चारही प्रक्षेत्रांत करण्यात आलेल्या गणनेत एकूण 1349 प्राणी आढळले आहेत. यामध्ये हिंगोली परिक्षेत्रात 283, औंढा नागनाथ परिक्षेत्रात 681, वसमत परिक्षेत्रात 197 तर सेनगाव वन परिक्षेत्रात 188 प्राणी आढळल्याच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्राणी हे औंढा नागनाथ वन परिक्षेत्रात आढळले आहे. या खालोखाल हिंगोली वन परिक्षेत्राचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून निलगाय, काळवीट, हरिण, रानडुक्‍करांच्या संख्येत वाढ होत असल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

जंगलाशेजारी असलेली संपूर्ण शेती फस्त केली जात असल्याचे चित्र मागील काही वर्षांत समोर आले आहे. वन्यप्राण्यांनी नुकसान केलेल्या पिकांच्या नुकसानीपोटी वन विभागाकडून भरपाई दिली जात असली तरी हातातोंडाशी आलेले पीक जात असल्याने शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. एकंदरित वन्यप्राणी गणनेत रानडुक्‍करांची वाढलेली संख्या चिंता करणारी ठरणार आहे.मागील काही महिन्यांत जिल्ह्यात रानडुक्‍करांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर वन विभागाने सतर्क राहून वन्यप्राण्यांचा वावर जंगलात राहावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षापासून शतकोटी वृक्ष लागवड उपक्रमातून जंगल वाढीला चालना मिळाली आहे.