Thu, May 23, 2019 20:57
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › हिंगोली एसडीएम कार्यालयास आयएसओ मानांकन प्राप्‍त

हिंगोली एसडीएम कार्यालयास आयएसओ मानांकन प्राप्‍त

Published On: Jul 27 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 1:33AMहिंगोली : प्रतिनिधी

हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन प्राप्‍त करण्यासाठी सप्टेंबर 2017 पासून तत्कालीन एसडीएम प्रशांत खेडेकर यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून, मराठवाड्यातील पहिले आयएसओ मानांकन मिळविणारे हिंगोली उपविभागीय कार्यालय ठरले आहे.

जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी सप्टेंबर 2017 पासून सुरुवात केली. यामध्ये त्यांनी अभिलेखे अद्यावत करण्यासाठी तसेच कार्यालयीन परिसर स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली. मोहिमेमध्ये कोतवाल संवर्गापासून शिपाई, अव्वल कारकुन, लिपिक, नायब तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी सहभागी होत, सर्व जुन्या अभिलेखाची छाननी करून त्याची शासन निर्णयानुसार अ,ब,क,ड अशी वर्गवारी केली. सुमारे 1 लाख जुन्या दस्तावेजाची नोंद संगणकाची करण्यात आली. जुने दस्तावेज शोधण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागत होता, ते आता काही मिनीटात शोधणे शक्य झाले आहे.

कार्यालयीन कर्मचारी यांच्या कामाचा दर आठवड्याला आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी मार्गदर्शन करून शून्य पेंडन्सीकडे वाटचाल करण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रेरित केले. उपलब्ध साहित्याचा सुसूत्रबद्ध पद्धतीने वापर करून कार्यालय सुशोभीत केले. यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अभ्यागतांना बसण्याची व्यवस्था, स्वागत कक्ष, मदत कक्ष, पार्किंग व्यवस्था, कर्मचार्‍यांसाठी गणवेश, ओळखपत्र तसेच संदर्भीय वाचन साहित्यासाठी लागणारे विविध कायदेविषयक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. महिनाभरापूर्वीच एसडीएम खेडेकर यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रुजू झालेल्या अतुल चोरमारे यांनी आयएसओ मानांकनाकडे होणारी वाटचाल पूर्णत्वास नेण्यासाठी परिश्रम घेतले. दि.23 जुलै रोजी एसडीएम कार्यालयाला आयएसओ 9001ः2015 मानांकन प्राप्‍त झाले. यश कन्सल्टिंग सर्व्हिसेस सोलापूर  यांच्या दाव्यानुसार आयएसओ मानांकन मिळविणारे मराठवाड्यातील पहिले हिंगोली उपविभागीय कार्यालय असल्याचे सांगितले.

हिंगोली उपविभागीय कार्यालयाला नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्‍त झाले आहे. यासाठी सर्वच कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. तसेच जिल्हाधिकारी भंडारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्यामुळेच ते शक्य झाले. मी सर्व कर्मचारी, अधिकार्‍यांचे आभार मानतो. जनतेची कामे या कार्यालयातून जलदगतीने व्हावेत अशी प्रतिक्रिया प्रशांत खेडेकर यांनी व्यक्‍त केली.