होमपेज › Marathwada › शिक्षणासाठी शालेय मुलांचा  रिक्षातून जीवघेणा प्रवास

शिक्षणासाठी शालेय मुलांचा  रिक्षातून जीवघेणा प्रवास

Published On: Mar 01 2018 1:34AM | Last Updated: Feb 28 2018 11:51PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्हाभरात परिवहन अधिकारी व पोलिस अधिकार्‍याच्या आशीर्वादाने अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. प्रवाशांबरोबरच शाळकरी मुलांनाही कोंबून प्रवास करावा लागतो आहे. असाच प्रकार जवळा पळशी रस्त्यावर राजरोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. सात प्रवाशांची क्षमता असलेल्या प्रवासी रिक्षामध्ये तब्बल 30 शाळकरी मुलांना कोंबून शाळेत घेऊन जात असताना आरटीओ कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी ताब्यात घेऊन संबंधित ऑटोचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर नेहमीच अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते. या प्रवाशी वाहतुकीला प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यासह पोलिसांच्या संमतीने अप्रत्यक्ष परवानगी दिल्याची ओरड होत असताना  याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार घडत होता. जवळा पळशी रस्त्यावर या भागातील विद्यार्थी हिंगोली येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करतात. या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो.

त्यातच या मार्गावर विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याच्या तक्रारी हिंगोली ग्रामीण पोलिसांसह प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याकडे करण्यात आल्या होत्या; परंतु या दोन्ही विभागांच्या अधिकार्‍यांचे साटेलोटे वाहनधारकांशी असल्यामुळे कारवाई करण्यास कोणी धजावत नसे. बुधवारी सकाळी खांबाळाहून येणार्‍या रिक्षाचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर जागे झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार निरीक्षक जाधव यांनी तत्काळ जवळा पळशी रस्त्यावर धाव घेऊन रिक्षाचालकास ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेकडे रवाना केले. संबंधित रिक्षाचालकास नियमानुसार दंड लावून त्यास सोडून देण्यात आले.