Mon, Apr 22, 2019 11:47होमपेज › Marathwada › मोंढा बंद झाल्याने खेडा खरेदी जोरात

मोंढा बंद झाल्याने खेडा खरेदी जोरात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

हिंगोली : प्रतिनिधी

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोंढा सलग दहा दिवस बंद राहणार असल्यामुळे शहरातील खेडा खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना सुगीचे दिवस आले आहे. तब्बल दीडशे ते दोनशे रुपयांच्या फरकाने शेतकर्‍यांकडून मालाची खरेदी केली जात असल्याने उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे खेडा खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांच्या नफ्यात मात्र मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.

मार्च एंडिंग व इतर कारणामुळे दि.24 मार्चपासून हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद झाले आहे. तब्बल 4 एप्रिल पर्यंत मोंढा बंद राहणार असल्याने शहरात खासगी खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना सुगीचे दिवस आले आहे. 24 मार्चपर्यंत मोंढ्यात हरभर्‍याला 3450 रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळत होता, परंतु मोंढा बंद झाल्याने अडचण असलेल्या शेतकर्‍यांनी खेडा खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांकडे आपला माल विक्री करण्यास नेण्यास सुरुवात केल्यामुळे व्यापार्‍यांनी हरभर्‍यासह सोयाबीनचे दर पाडले आहे. सोमवारी हरभर्‍याची 3250 ते 3300 रुपये प्रतिक्‍विंटल खरेदी केली जात होती. तसेच सोयाबीन 3800 ते 3850 ने खरेदी होत असतांना मोंढा बंद झाल्यामुळे व्यापार्‍यांनी 3650 ते 3700 रुपये प्रति क्‍विंटलने सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे.

हरभर्‍याला शासनाने 4400 रूपये प्रतिक्‍विंटलचा हमीभाव जाहीर केला असून जिल्ह्यात तीन ठिकाणी हरभरा खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये हिंगोली, कळमनुरी व सेनगावच्या केंद्राचा समावेश आहे. परंतु कृषी विभागाकडून प्रती एकरी उत्पादकता प्रमाणपत्र सादर न झाल्यामुळे हरभरा खरेदी रखडली आहे. आतापर्यंत जवळपास 3 हजार हरभरा उत्पादक शेतकर्‍यांनी आपला माल विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु उत्पादकता प्रमाणपत्र प्राप्‍त न झाल्यामुळे हरभरा खरेदी थांबली आहे. त्यातच 24 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान हिंगोलीच्या मोंढ्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. मार्च एण्डींग व सलग आलेल्या सुट्यांमुळे हा व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली आहे.

मार्च एंडिंगमुळे अनेक शेतकर्‍यांना जुने व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपला माल विकण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे शहरात आठ ते दहा खेडा खरेदी करणारे व्यापारी आहे. मोंढ्यातील खरेदी बंद झाल्याची संधी साधून खासगी व्यापार्‍यांनी सोयाबीन व हरभर्‍याची खरेदी पड्या दराने सुरू केली आहे. नाईलाजामुळे शेतकरी व्यापार्‍यांकडे आपला माल विक्री करीत आहे. 

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मागील काही महिने खेडा खरेदी विरोधात मोहिम राबवून बाजार समिती यार्डातच माल विक्री करण्यासंदर्भात बंधनकारक करण्यात आले होते. हिंगोली शहर वगळता ग्रामीण भागातील खेडा खरेदी बंद करण्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालय यशस्वी ठरले. परंतु शहरातील बड्या व्यापार्‍यांच्या खरेदीकडे मात्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

Tags :  Hingoli news,  Hingoli Agricultural Produce Market Committees, Mondha closed, ten day,


  •