होमपेज › Marathwada › ३१ पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची मदार

३१ पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची मदार

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 18 2018 11:58PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात तापमान 43 अंशांवर पोहचल्याने जंगलातील वन तळे कोरडेठाक पडल्याने वनविभागाच्या वतीने मागील महिनाभरापासून तब्बल 31 हंगामी पाणपठ्यांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची तहान भागविली जात आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात असलेल्या प्रमुख तीन धरणांच्या काठावर शेकडो वन्यप्राण्यांचा मुक्काम वाढला आहे. वन विभागाच्या वतीने वन्य प्राण्यांची पाण्याअभावी हेळसांड होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

जिल्ह्यात मोठे वन क्षेत्र असल्याने प्राण्याची संख्याही मोठी आहे. मागील महिन्यात झालेल्या वन्यप्राणी गणनेत विविध प्रकारचे दीड हजार प्राणी जंगलात आढळून आले होते. वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे वन विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. वन्यप्राण्यांची साखळी कायम राहावी यासाठी, वन विभागाकडून विशेष प्रयत्न केले जातात. पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी बारमाही पाणीसाठे तयार करण्याबरोबरच हंगामी पाणी साठे उपलब्ध करून देण्यावर वन विभागाचा भर राहिला आहे. वन विभागाचे जिल्ह्यात चार परिक्षेत्र आहे. यामध्ये हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ व वसमत वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. या वन परिक्षेत्रांमध्ये बारमाही पाणीसाठे व हंगामी पाणीसाठ्यासंदर्भात वन विभाग कायम सतर्क राहिला आहे. हिंगोली विभागात प्रमुख चार तलाव, 30 वनतळे, 12 मातीनाला बांध, 2 सिमेंट नाला बांध आहेत. सेनगाव वन परिक्षेत्रात 2 तलाव, 26 वन तळे, 16 मातीनाला बांध, औंढा नागनाथ वन परिक्षेत्रात दोन तलाव, 50 वनतळे, 35 मातीनाला बांध, 13 सिमेंट नाला बांध तर वसमत वन परिक्षेत्रात 34 वनतळे, 2 सिमेंट नाला बांध समाविष्ट आहे. हे बारमाही स्त्रोत असले तरी मागील पंधरवाड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहे. परिणामी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर तब्बल 31 ठिकाणी हंगामी पाणवठे उभारून पाणवठ्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.