Mon, Jun 17, 2019 03:14होमपेज › Marathwada › हिना गावित यांच्यावरील हल्‍ल्याचे नंदुरबारमध्ये तीव्र पडसाद

हिना गावित यांच्यावरील हल्‍ल्याचे नंदुरबारमध्ये तीव्र पडसाद

Published On: Aug 06 2018 2:57PM | Last Updated: Aug 06 2018 2:56PMनंदुरबार: प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाहनावर धुळे येथे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे तीव्र पडसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटले. यामुळे प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात कडकडीत बंद पाळून  या घटनेचा आज सोमवारी तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

तसेच विविध सामाजिक संघटनांनी शेकडो नागरिकांच्या सहभागाने निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चकऱ्यांनी खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला करण्याचे भ्याड कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. 

मोर्चा काढण्यापूर्वी नंदुरबार शहरातील प्रमुख चौकांमध्ये संतप्त कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली. चौकाचौकात टायर जाळून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून संपूर्ण शहरातून बंदचे आवाहन केले. नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान खांडबारा येथे काही संतप्त कार्यकर्त्यांकडून दगडफेकीचे किरकोळ प्रकार घडले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विविध संघटनांनी एकत्रित जाऊन निषेध नोंदवणारी निवेदने दिली.