Fri, Nov 16, 2018 06:37होमपेज › Marathwada › हमीच्या तूर खरेदीला हेक्टरी मर्यादेचे विघ्न

हमीच्या तूर खरेदीला हेक्टरी मर्यादेचे विघ्न

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:22AMहिंगोली : प्रतिनिधी

शासनाने जाहीर केलेल्या तूर खरेदी केंद्रावर हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना केवळ हेक्टरी साडेसात क्‍विंटल तुरीची विक्री करता येणार असल्याने, तूर उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. 
एकीकडे हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा करायची व दुसरीकडे विक्रीसाठी मर्यादा निश्‍चित करण्याच्या धोरणामुळे खर्‍या शेतकर्‍यांची मोठी कोंडी होत असल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यांनी या निर्णयावरून नाराजी व्यक्‍त केली आहे.

केंद्र शासनाने सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात हेक्टरी साडेसात क्‍विंटल तूर विक्रीची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात जवळपास 35 हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली असून तुरीला हेक्टरी 15 ते 18 क्‍विंटलचा उतारा येत असताना राज्य शासनाने मात्र व्यापार्‍यांचा फायदा होऊ नये, असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हिंगोलीसाठी हेक्टरी साडेसात क्‍विंटलची मर्यादा घातली आहे. तसा आदेशही नुकताच देण्यातआल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्‍त केली जात आहे. राज्य सरकारने 5 हजार 450 रुपये आधारभूत किमत जाहीर केली असून या आधारभूत किमतीनुसार राज्य शासन तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर खरेदी करणार आहे. सध्या तरी सेनगाव वगळता कुठेही हमीभावाने तूर खरेदी सुरू झालेली नाही. जिल्ह्यासाठी पाच खरेदी केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असल्या तरी अद्यापही केंद्र सुरू करण्याचा मुहूर्त मिळाला नसल्याने उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजी असताना पुन्हा नवा आदेश येऊन धडकल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यांमधून प्रचंड नाराजी व्यक्‍त केली जात आहे. शिल्‍लक तूर शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना विकावी लागणार असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या बाजारात 4400 ते 4600 रुपये प्रतिक्‍विंटलने तुरीची खरेदी केली जात आहे, तर हमीभाव हा 5 हजार 450 रुपये असल्याने क्‍विंटलमागे शेतकर्‍यांना किमान एक हजार रुपये तोटा सहन करावा लागणार आहे.