होमपेज › Marathwada › आंबे विक्रीतून सेवालयास मदत

आंबे विक्रीतून सेवालयास मदत

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 25 2018 9:48PMपरभणी : प्रतिनिधी

आम्ही सेवक संस्था संचलित सेवालय प्रकल्प हासेगाव (जि.लातूर) येथे 75 एचआयव्हीसह जगणार्‍या अनाथ मुला-मुलींचे पुनर्वसन केले जाते. या संस्थेला परभणीतील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च ऍण्ड चॅरिटीज (एच. ए.आर.सी) या संस्थेने 25 हजारांची आर्थिक मदत केली आहे.ही संस्था एचआयव्ही बाधित अनाथ बालकांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर 2010 पासून काम करीत आहेत. परभणीतील जीवनरेखा बालगृहात असलेली ही मुले  2014 मध्ये सेवालय लातूर येथे स्थलांतर झाली. त्यावर या मुलांच्या विविध मूलभूत प्रश्न व आता या मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी या संस्थेद्वारे वेळोवेळी विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जात आहते. यावर्षी वादळी पाऊस, गारपीट सारख्या प्रतिकूल परिस्थितीत देखील सेवालयातील मुलांनी पाण्याचे ड्रीप पद्धतीने केलेले व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर व व्यवस्थित  देखभाल यामुळे यावर्षी जवळपास 600 किलो केशर आंबे झाडास निघाले. 

त्यातील आजपर्यंत एकट्या परभणीत 200 किलो नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला केशर आंबा 125 रुपये प्रति कलो दराने विकून ‘आम्ही सेवक संस्था’ सेवालय प्रकल्पाला  25 हजार रुपयांची मदत धनादेश द्वारे एच. ए.आर.सी संस्थेमार्फत करण्यात आली. या उपक्रमातून परभणीकरांना दर्जेदार असा कार्बाइड विरहित नैसर्गिकरीत्या पिकवलेला केशर आंबाही मिळाला आणि त्याचवेळी सेवालयाला मदत केल्याचा आनंदही घेता आला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी एचएआरसी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, सेवालयाचे संस्थापक रवी बापटले, बसंती सत्यनारायण चांडक, अविनाश विभुते, अरुण ओझा, डॉ. संजय बंगाळे, राहुल पतंगे, संजय मंत्री, प्रा.छगन शिंदे आदींनी प्रयत्न केले.

जनजागृतीने  बदल : एकेकाळी एचआयव्हीविषयी असलेल्या गैरसमजामुळे या मुलांना समाजात मिसळून शिक्षण, व्यवसाय, रोजगारासाठी वेळोवेळी अडचणी यायच्या, पण आता एड्सविषयक जनजागृती उपक्रमामुळे ही परिस्थिती बदलली आहे. आता शेतीतून व फळबाग कामातून मुलांना उत्पन्न मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून मागील वर्षी एचएआरसी ट्रस्टतर्फे  228 किलो आंब्याची परभणीत विक्री करून यातून सेवालयास 22 हजार 800 रुपयांची मदत केली होती. तसेच मागील वर्षी 108 गणेश मूर्ती विक्रीतून 53 हजारांची मदत देखील केली होती.