Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Marathwada › पावसाची जोरदार हजेरी

पावसाची जोरदार हजेरी

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 10:02PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी (दि. 4 ) मध्यरात्रीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या या पावसामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. शहरातील शंकर नगर भागात मारोती मंदिरावर वीज कोसळून बांधकामाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. मोसमी पाऊस अजून दाखल झालेला नसला तरी पूर्व मोसमी पावसाची जिल्ह्यात 3-4 दिवसांपासून आगमन झाले आहे. रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारी मध्यरात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यंत्रणेकडून दररोज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या पावसाची नोंद घेण्यात येते. त्यानुसार मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 11.77 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. परभणी शहरात 27 मि. मी. तर तालुक्यात सरासरी 19.50 मि. मी., पालम तालुक्यात सरासरी 7 मि. मी., पूर्णा तालुक्यात 8.60 मि. मी., गंगाखेड तालुक्यात 6.50 मि. मी., सोनपेठ तालुक्यात 23 मि. मी., सेलू 14 मि. मी., पाथरी तालुक्यात 5 मि. मी., जिंतूर तालुक्यात 17.67 मि. मी. आणि मानवत तालुक्यात 4. 67 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही

सोमवारी मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली. दरम्यान मंगळवारी पहाटे विजांच्या कडकडाटांसह झालेल्या पावसाने शहरातील शंकर नगरातील मारोती मंदिरावर वीज कोसळल्याने भूकंप झाल्याप्रमाणे हादरा बसला. 

मंदिराचे बांधकाम पक्के असल्याने ते पडले नाही; परंतु कळसाखालील सिंमेटचा भाग तुटून तो परिसरातील घरांवर जाऊन पडला. दरम्यान या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. 

पावसाळ्याला सुरुवात झाल्याने नागरिकांनी विजेपासून संरक्षण मिळविण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जाहीर केलेले उपाय अमलात आणावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी केले आहे.