होमपेज › Marathwada › आष्टी तालुक्यात कॉप्यांचा सुळसुळाट 

आष्टी तालुक्यात कॉप्यांचा सुळसुळाट 

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:31PMआष्टी : प्रतिनिधी

तालुक्यातील धानोरा येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या परिक्षेदरम्यान कॉप्यांचा सुळसुळाट पहावयास मिळाला.विशेष म्हणजे यावेळी काही पालकवर्गच या ठिकाणी पाल्याला कॉप्या पुरवित असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे परिक्षा नेमकी पाल्याची का की पालकांची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला नसेल तर नवल.

धानोरा येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बारावीच्या मराठी विषयाच्या  पेपरला सुरुवात झाली. विशेष म्हणजे यावेळी या केंद्रावर नियमानुसार बैठे पथक असावे लागते परंतू या ठिकाणी असे कुठलेही पथक आढळून आले नाही. याहूनही उलट पालकांचीच आपल्या पाल्याला पास होण्यासाठी सुरु असलेली भागमभाग दिसून आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य कॉपीधारक पालक कसे घडविणार असा प्रश्न उपस्थीत होऊ लागला असून मराठी सारख्या भाषिक पेपरला देखील कॉप्यांचा मोठा सुळसुळाट दिसला.  पञकारांच्या टिमने ज्यावेळी सदर केंद्राची पाहणी करण्यास सुरुवात केली त्यानंतर लगेचच हॉलच्या खिडकीतून कॉप्या बाहेर फेकण्यात आल्या. 

पाच कॉपी बहाद्दरांवर भरारी पथकाकडून कारवाई
कडा येथील मोतीलाल कोठारी ज्यु. महाविद्यालयात बीड येथील माध्यमिकचे उपशिक्षणधिकारी एस.व्ही.जैस्वाल व जेष्ठ विस्तार अधिकारी मनोज धस ,मोहन काकडे यांच्या भरारी पथकाने पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडून कारवाई केली आहे. कडा येथील मोतीलाल कोठारी ज्यु महाविद्यालयात बारावी परीक्षेसाठी 352 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बीड येथील भरारी पथकाने वर्गात जाऊन पाहणी केली असता पाच जण कॉपी करताना आढळून आले. त्यापैकी एका विद्यार्थ्यांकडे चक्क वर्गात मोबाइल आढळून आला, तर दुसर्‍या एकाकडे हेडफोन सापडले तर उर्वरित तीन विध्यार्थ्यांकडे हिंदी विषयाच्या मायक्रो कॉपी सापडल्याने त्या पाचही जणांवर बोर्डाच्या नियमानुसार कारवाई केली. यामुळे कॉपी करणार्‍यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.