Sat, Aug 17, 2019 17:08होमपेज › Marathwada › स्वत:चे दु:ख विसरून इन्फंट इंडियाच्या चिमुकल्यांनी पुसले पूरग्रस्तांचे अश्रू

स्वत:चे दु:ख विसरून इन्फंट इंडियाच्या चिमुकल्यांनी पुसले पूरग्रस्तांचे अश्रू

Published On: Aug 30 2018 1:20AM | Last Updated: Aug 30 2018 1:20AMबीड : प्रतिनिधी

केरळमध्ये पुरामुळे 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. लाखो लोकं बेघर झाले. या नैसर्गिक अपत्तीतून पूरग्रस्तांना सावरण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. मदतीसाठी उभा राहिलेल्या मानवतेच्या चळवळीत पाली येथील इन्फंट इंडिया संस्थेतील एचआयव्ही बाधित चिमुकल्यांनी मदतफेरी काढून आपले योगदान दिले. स्वत:चे दु:ख विसरून पूरग्रस्तांचे अश्रू पुसणासाठी योगदान देणार्‍या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे. 

बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथे एचआयव्ही बाधित मुलांचा इन्फंट इंडिया नावाचा प्रकल्प आहे. सरकारी नोकरीचा त्याग करून संध्या दत्ता बारगजे या दाम्पत्याने उभा केलेल्या प्रकल्पावर अनाथ, वंचित, उपेक्षीत बालकांचे पालन-पोषण केले जाते. दानशूर लोकांच्या मदतीतून चालणार्‍या या प्रकल्पाने माणुसकीचा नवा आध्याय रचला आहे. देवभूमी म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये महापुराचे प्रलयकारी संकट कोसळल्यानंतर देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात मदतफेरी काढली. केरळ मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा ओघ सुरू असताना इन्फंट इंडिया संस्थेच्या एचआयव्ही बाधित अनाथ मुलांनी बीड शहरात मदतफेरी काढली. स्वत:चे दु:ख बाजुला सारून पूरग्रस्तांसाठी पुढे आलेल्या अनाथ, वंचित चिमुकल्यांना पाहून मोढा भागात हमाल बांधवांनीही पाच-दहा रुपये दिले. इन्फंटच्या चिमुकल्यांनी फेरी काढून गोळा झालेले 6 हजार 349 रुपये केरळ मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले. पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आलेल्या इन्फंट इंडियाच्या चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक होत असून चिमुकले मदत फेरी काढत असताना एका कवितेच्या ओळी अनेकांच्या ओठावर तरळल्या. मोडलेल्या माणसांची दु:ख ओली झेलताना... एक दीप लावू त्यांच्या उशाला...!