Tue, Jul 16, 2019 01:57होमपेज › Marathwada › गुटखा कारवाई : टेम्पो पकडला मात्र ड्रायव्हर पळाला

गुटखा कारवाई : टेम्पो पकडला मात्र ड्रायव्हर पळाला

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:21PMपरळी : प्रतिनिधी

अतिरिक्त पोलिस अधीक्षक पथकाने गुटखा घेऊन जात असलेला टेम्पो मंगळवारी मध्यरात्री पकडला मात्र चालक पळून गेला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकार बुधवारी दुपारी परळी ठाण्यात कारवाईसाठी आले, परंतु गुटखा वाहतूक करणारा आरोपी नसल्याने पकडलेला गुटख्याचा पंचनामा व गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. परिणामी या प्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. 

परळीकडे येणार्‍या एका  टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत जवळपास 40 पोते गुटखा पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोराडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक नरहारी नागरगोजे, सखाराम पवार, बाबासाहेब आचार्य, सचिन सानप केली.

दरम्यान, गुटखा जप्‍त केल्यास त्याची कारवाई करण्याचे अधिकार  केवळ अन्न व औषध प्रशासन विभागास आहे. बुधवारी गुटखा जप्‍त केल्याची माहिती सहायक आयुक्‍त अभिमन्यू केरुरे यांना परळी पोलिसांनी दिली. त्यांनी अन्न सुरक्षा अधिकार त्या ठिकाणी पाठविले मात्र टेम्पो चालक पळून गेल्याने कारवाई होत नसल्याचे पोलिसांना सांगितले. संपूर्णपणे तपासणी करून मगच कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याशिवाय कारवाई करता येत नाही. टेम्पो चालक, मालक, व्यापारी आदी हजर झाल्याशिवाय कारवाई प्रक्रिया पूर्ण होत नाही. 

पंचनाम्यासाठी तांत्रिक बाब

या प्रकरणी पंचनामा व कारवाई करण्यासाठी आरोपी आवश्यक आहे. त्याशिवाय पंचनामा करता येणे शक्य नाही ही तांत्रिक बाब आहे. या प्रकरणी टेम्पोचालक वाहन सोडून पळून गेला आहे. टेम्पोच्या मालकीबाबत ही अद्याप कोणी पुढे आले नाही. या मालाचा मालकही कोण आहे हे माहीत नाही त्यामुळे पुढची कारवाई ठप्प झाली आहे. दरम्यान, ही कारवाई पोलिसांनी केली आहे मात्र कोण आरोपी आहे, हे या प्रकरणी अद्याप पोलिसांनी समोर आणलेले नाही. त्यामुळे पंचनामा व कारवाई करता येत नाही. आरोपी निष्पन्न झाल्यानंतरच या प्रकरणाची पुढील कारवाईची प्रक्रिया करता येणार आहे, असे अन्न विभागाने स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी गुटखा पकडला आहे, मात्र आरोपी नसल्याने पंचनामा होऊ शकत नाही. ज्याच्या गाडीत गुटखा पकडला आहे तो समोर असणे आवश्यक आहे. नियमानुसार हे आवश्यक आहे. गुटख्याचा पंचनामाकरून नमुने काढावे लागतात. त्यासाठी आरोपी समोर असणे नियमास धरून आहे. - अभिमन्यू केरुरे, सहायक आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन, बीड.