Tue, May 21, 2019 22:58होमपेज › Marathwada › वर्षभरात 83 लाखांचा गुटखा जप्‍त

वर्षभरात 83 लाखांचा गुटखा जप्‍त

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:49PMबीड : शिरीष शिंदे

अन्न व औषध प्रशासन विभागाने अवैधरित्या विक्री होणार्‍या गुटख्यावर कारवाई सत्र वाढविले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कारवाया वाढल्याचे दिसून येत आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात धाडी टाकून एकूण 83 लाखांचा गुटखा जप्‍त करण्यात आला आहे. सोबतच 53 लाखांचे साहित्यही जप्‍त करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त अभिमन्यू केरुरे यांनी जवळपास दहा महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचे सत्र अवलंबिले. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व कारवायासह गुटखा कारवाईवर विशेष लक्ष दिले. त्यामुळे बीड शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यात अवैध गुटखा विक्री व साठ्यांवर कारवाई करत माल जप्‍त करण्यात आला. शासनाच्या नियमानुसार, गुटखा जप्‍त करून तो ज्या ठिकाणी ठेवला आहे, ती जागाही सील केली गेली. त्यामुळे गोडाऊन, टपर्‍या सील केल्या गेल्याने गुटखा माफि यांमध्ये एकच दहशत पसरली. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये सदर प्रकरणाचे गुन्हे दाखल असून गुटखा संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आला आहे. 

वर्षभरात 44 प्रकरणे दाखल

गुटखा, पान मसाला विक्रीवर बंदी असतानाही त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी किंवा माहिती प्राप्‍त झाल्यानंतर कारवाई करण्यात येते. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात धाडी टाकून एकूण 83 लाख 32 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्‍त करण्यात आला आहे. तर ज्या वाहनातून हा गुटखा नेला जात होता अशा वाहनासह इतर असे 53 लाख रुपयांचे साहित्य जप्‍त करण्यात आले आहे, दरम्यान 2016-17 या वर्षात एकूण 73 लाख रुपयांचा गुटखा जप्‍त केला आहे.


गुटख्या विरोधात व्यापक जनजागृती

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त अभिमन्यू केरुरे यांनी गुटख्या विरोधात कारवाई सत्र तर अवलंबिलेच आहे. विद्यार्थ्यांनी गुटखा व पान मसाला खाण्यापासून दूर रहावे यासाठी सहायक आयुक्‍त केरुरे हे स्वतः शाळा, कॉलेजमध्ये जाऊन गुटख्या विरोधात व्यापक जनजागृती करत आहेत. गुटखा खाण्याने काय आजार होतात? याची माहिती बॅनरच्या माध्यमातून दिली जात आहे. एवढेच नव्हे तर केरुरे यांच्या कार्यालयातील रूममध्येही नियमित गुटखा खाल्ल्यामुळे मुख रोगाचे आजार दर्शविनारे बॅनर लावले आहे.  

97 नमुने घेतले तपासणीला

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मानदे कायद्यार्तंगत एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत एकूण 97 नमुने तपासणीला घेतले होते. त्या पैकी 90 नमुने तपासणीनंतर प्रमाणीत तर 6 नमुने अप्रमाणित झाले आहेत. 1 नमुन्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अप्रमाणीत नमुन्यांमध्ये दुधाचे 3, खव्याचा 1, तेलाचा 1 व इतर 1 यांचा समावेश आहे,  दरम्यान 2016-17 या वर्षात एकूण 63 नमुने तपासली गेली. त्यात प्रमाणीत 44 तर 5 अप्रमाणीत नमुने आढळून आली होती. 

Tags : Marathwada, Gutkha, 83, lakhs, seized, during, year