Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Marathwada › ढाब्यावर पार्टी; गुरूजींना पकडले

ढाब्यावर पार्टी; गुरूजींना पकडले

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:01PMबीड : प्रतिनिधी

अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून शुक्रवारी रात्री सहा तास कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारी वस्त्या, हॉटेल, लॉज आणि ढाब्यांची  झडती घेण्यात आली. यावेळी सहा अट्टल गुन्हेगारांसह ढाब्यावर दारू पार्टी करणारे शिक्षक, मंत्रालयीन कक्षाधिकारी, मंडळाधिकार्‍याची पोलिसांनी धरपकड केली. 

पालक मंत्री पंकजा मुंडे यांनी 15 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची डेडलाईन बीड पोलिसांना दिली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा कामाला लागली असून पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशावरून  रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान बीड शहर आणि परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले़   स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह सर्व ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी यांनी रात्रभर धाडी मारल्या. 46 गुन्हेगारी वस्त्यांची तपासणी केली. यामध्ये पोलिसांना हवे असलेल्या 6 अट्टल गुन्हेगारांना अटक केली़ चार जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून जुगार्‍यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर 230 हॉटेल, लॉजचीही तपासणी करण्यात आली.

पेठ बीड भागात रात्री 11 नंतर खानावळ उघडी ठेवल्याने एकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली़ 61 लोकांना समन्स तामिल करण्यात आल्या,  तसेच 30 अजामीनपत्र व 68 जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. एका हद्दपार केलेल्या आरोपीस  गेवराईमध्ये अटक करण्यात आली. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. 1363 वाहनांची तपासणी करून 94 वाहनांवर कारवाई करण्यात केली. त्यांच्याकडून 20 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणे प्रमुख यांनी कारवाईत सहभाग नोंदविला. पोलिसांच्या या कोंबिग ऑपरेशनमध्ये गुरुजींसह मंत्रालयीन कक्षाधिकारी आणि मंडळ अधिकारी आढळून आल्याने रात्री ढाब्यावर बसून पार्टी करणार्‍या शिक्षक व अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.