Fri, Nov 16, 2018 13:11होमपेज › Marathwada › गेवराई-बीड महामार्ग बनला मृत्यूमार्ग

गेवराई-बीड महामार्ग बनला मृत्यूमार्ग

Published On: Feb 09 2018 2:16AM | Last Updated: Feb 09 2018 2:13AMगेवराई : प्रतिनिधी

तालुक्याची हद्द असलेल्या गोदावरी नदी-गेवराई ते बीड दरम्यान धुळे-सोलापूर हा महामार्ग सध्या मृत्यूमार्ग बनल्याचे चित्र आहे. या महामार्गावरील अपघाताच्या मालिकेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. गत महिन्यात सहा अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, मात्र चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

गेवराई तालुक्यातून गेलेल्या धुळे-सोलापूर या महामार्गावरून वाहनांची मोठी ट्राफिक असते. मात्र महामार्ग सध्या अपघात महामार्ग म्हणून चर्चेत येत आहे. एक तर महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे व दुसरीकडे महामार्गाचे सुरू असलेले काम यामुळे हे अपघात घडत असून, प्रशासन, संबंधित विभाग व गुत्तेदाराविरोधात नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्या या महामार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. 

खड्ड्यामुळे महामार्गाची एवढी दुरवस्था झाली आहे की दुचाकीवरून प्रवास करताना तर खड्डा चुकवावा कोणता? असा प्रश्‍न वाहन धारकांना पडत आहे. वेळोवेळी महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष केले जात असेल आणि अनेकांचे अपघातात नाहक बळी जात असतील तर याविरोधात जनतेतून एक व्यापक आंदोलन उभारण्याची गरज आहे.