होमपेज › Marathwada › पळसगांव शिवारातील पाझर तलाव फुटुन शेतीचे मोठे नुकसान

पळसगांव शिवारातील पाझर तलाव फुटुन शेतीचे मोठे नुकसान

Published On: Jun 23 2018 6:57PM | Last Updated: Jun 23 2018 6:56PMउमरगा : प्रतिनिधी

मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी, रात्री तब्बल तीन तास झालेल्या पावसाने शेती-शिवाराचे नुकसान झाले. तर, पंधरा दिवसात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने पळसगांव शिवारातील पाझर तलाव फुटुन शेतीचे मोठे नुकसान झाले. 

यंदाच्या पावसाळ्यात तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच २०८ मिलीमीटर पाऊस होवून अतिवृष्टी झाली. या जोरदार पावसाने शहर जलमय झाले. तर, पशुधनासह, शेती व घरांचे मोठे नुकसान झाले. तब्वल पंधरा दिवसानंतर पावसाने शुक्रवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावल्याने उमरगा, मुळज व नारंगवाडी मंडळ विभागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. 

पाझर तलाव फुटला; शेतीचे नुकसान

शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तीन तास झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक तलाव ओसंडून वाहत होते. यात पळसगांव शिवारातील पाझर तलाव क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने फुटुन शेतीचे मोठे नुकसान झाले. तलाव क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जवळपास ३६ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीचे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.