Fri, May 24, 2019 07:08होमपेज › Marathwada › ग्रामपंचायतला आता ऑनलाइनचा तडका

ग्रामपंचायतला आता ऑनलाइनचा तडका

Published On: Mar 24 2018 2:21AM | Last Updated: Mar 24 2018 2:21AMबीड : दिनेश गुळवे

सरकारने अनेक योजना, कार्यालयातील कामांना ऑनलाइनची फोडणी दिल्यानंतर आता ग्रामपंचायतच्या कारभारालाही ऑनलाइनचाच तडका देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. साहजिकच सर्व कारभार एका क्‍लिकवर होणार आहे.  सर्व दाखले ग्रामस्थांना ऑनलाइन मिळणार असून रजिस्टर व इतर साधनांवर होणारा खर्चही वाचणार आहे. येत्या एक एप्रिलपासून जिल्हाभरात ही प्रणाली लागू केली जाणार आहे. 

ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाची पंढरी आहे. ग्रामस्थांना विविध सेवा देणे, ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, ग्रामस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करणे आदी कामे ग्रामपंचायतकडून केली जातात. यासाठी सरकार ग्रामपंचायतमार्फत मोठ्या प्रमाणावर निधीही खर्च करते. गेल्या काही वषार्र्ंत शासनाकडून अनेक योजना, कार्यालय यांचा कारभार ऑनलाइन केला आहे.  आता ग्रामपंचायतचा कारभारही पेपरलेस करीत सर्व व्यवहार ऑनलाइन केले जाणार आहेत. 

नागरिकांना विविध प्रकारचे दाखले कागदावर दिले जातात. यासह ग्रामपंचायतचे सर्व रेकॉर्ड रजिस्टरवर असते. ग्रामसभेचे निर्णय, अंदाजपत्रक, खर्च-शिल्लक, योजना सर्व कागदोपत्री असते. आता यास खो दिला जाणार आहे. सर्व दस्तावेज ऑनलाइन करून दाखलेही ऑनलाइनच दिले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील निवडक ग्रामसेवकांना यशदा येथील अधिकारी प्रशिक्षणही देत आहेत. येत्या एक एप्रिलपासून जिल्हाभरात ऑनलाइन कारभार सुरू होणार आहे. 

Tags : Marathwada, Marathwada News, Gram Panchayat, the rural development