Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Marathwada › वैद्यनाथ दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपये  

वैद्यनाथ दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपये  

Published On: Dec 09 2017 5:37PM | Last Updated: Dec 09 2017 5:37PM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या  दुर्घटनेतील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सहा लाख आणि जखमींना दिड लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. कारखान्यातर्फे तीन लाख,  मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये व अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख असे एकूण सहा लाख रुपये आणि जखमींना  दीड लाख रुपये मदत देण्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केली. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत अकरा कर्मचारी जखमी झाले होते. त्यातील सुभाष कराड, मधुकर आदनाक, गौतम घुमरे या तीन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अन्य जखमींवर लातूर येथील लहाने यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ना. पंकजाताई मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्री मुंडे यांनी आज लातूर येथे जाऊन जखमींची भेट घेतली. दुर्दैवी घटनेत कर्मचाऱ्यांच्या मृत्यू बद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘घटना अतिशय दुर्दैवी आहे. मयत व जखमी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांच्या मी पुर्णपणे पाठीशी आहे. कारखान्यातील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सहा लाख रुपये तसेच जखमी कर्मचाऱ्यांना दीड लाख रुपये मदत देण्यात येईल. रूग्णालयातील उपचाराचा संपूर्ण खर्च आम्ही करू याशिवाय मयताच्या कुटूंबातील एका व्यक्तीला कारखान्याच्या सेवेत सामावून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.