Fri, Jul 19, 2019 22:02होमपेज › Marathwada › शासनाकडून आतापर्यंत ६८२.२९ कोटींची कर्जमाफी

शासनाकडून आतापर्यंत ६८२.२९ कोटींची कर्जमाफी

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 1:02AMपरभणी : प्रतिनिधी

शासनाने कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत एकूण 1 लाख 80 हजार 940 शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी 40 हजार 40 शेतकर्‍यांच्या नावांत मोठी तफावत येत आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 5203, राष्ट्रीयीकृत बँकेचे 23021 व ग्रामीण बँकेचे 12176 अशा बँकनिहाय शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. 

योजनेच्या निकषांनुसार जिल्ह्यातील व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांच्याकडे असणार्‍या कर्ज खात्याची माहिती पोर्टलवर सादर केली आहे. शेतकर्‍यांनी दाखल केलेली माहिती व बँकेकडून आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीची सांगड घालण्यात येऊन त्यांच्यावर संगणकीय पध्दतीने प्रक्रिया करण्यात आली आहे. अर्जदार व बँकेकडील माहितीच्या आधारे ताळमेळ घालून जे अर्जदार या योजनेअंतर्गत पात्र ठरले त्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 1 लाख 25 हजार 424 लाभार्थी शेतकर्‍यांच्या यादीसह 682.29 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. शेतकर्‍यांच्या अर्जावर राज्यस्तरावर निर्णय घेणे शक्य नसलेल्या शेतकर्‍यांचा अर्जाचा तपशील (बँकेकडील आकडेवारीसह) जिल्हा, तालुका व बँक शाखानिहाय शासनाकडून पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेला आहे. संबंधित बँक शाखांना उपलब्ध केलेल्या यूजर आईडी व पासवर्डच्या आधारे अशा याद्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सदरील याद्या डाऊनलोड करून त्यांचे प्रिंट काढून संबंधीत बँक शाखेच्या सूचना फलकावर  प्रसिद्ध केला आहे.