होमपेज › Marathwada › गोपीनाथराव मुंडे अन्नछत्रास अंतिम मंजुरी 

गोपीनाथराव मुंडे अन्नछत्रास अंतिम मंजुरी 

Published On: Aug 30 2018 1:20AM | Last Updated: Aug 30 2018 1:20AMगंगाखेड ः प्रतिनिधी

शहरातील श्री संत जनाबाई मंदिराच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत प्रस्तावित लोकनेते गोपीनाथराव मुंडे अन्नछत्रास राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिल्याची माहिती नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी दिली आहे.

शहरात राज्यभरातून श्री संत जनाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या शेकडो भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार्‍या मंदिराच्या शेजारीच प्रस्तावित लोकनेते गोपीनाथराव मुंडे अन्नछत्रास बुधवारी अंतिम मंजुरी राज्य शासनाने दिल्याची माहिती नगराध्यक्ष तापडिया यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रस्ताव 2015-2016 या वर्षात नगर परिषदने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठवला होता. या अन्नक्षेत्रामध्ये दहा गुंठ्यांत भोजन हॉल, पाच गुंठ्यांत स्वयंपाक गृह व चार गुंठे जागा मोकळी ठेवण्यात येणार आहे. एकूण दोन कोटी रुपयांचे हे अन्नछत्र असणार आहे. त्यापैकी 83 लाख 50 हजार रुपये सन 2015-2016 ला नगर परिषदेला निधी वर्ग करण्यात आला होता; परंतु त्यावेळी नगर परिषदेत बहुमताअभावी संबंधित कामाचा ठराव मंजूर झाला नाही. 

2018 च्या मे महिन्यात नगर परिषदमध्ये पुन्हा ठराव संमत करून व जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता घेऊन सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. अखेर राज्य शासनाने यास अंतिम मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे विदर्भ व मराठवाडा या भागातील भाविकांची मोठी सोय झाली आहे. या अन्नछत्रामध्ये वर्षभर दररोज एक वेळेस मोफत अन्नदान केले जाणार आहे, अशी माहितीही नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी दिली.