Thu, Jul 18, 2019 06:52होमपेज › Marathwada › पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 10:58PMगंगाखेड : प्रतिनिधी

शहरातील दत्त मंदिर परिसरात झोला रोडवर असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेला चौदा वर्षीय मुलगा विहिरीत पडल्याची घटना 23 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. पाण्यात पडलेल्या मुलाचा शोध रात्री उशीरापर्यत सुरू होता. अखेर गुरुवारी सकाळी चार वाजता त्याचा मृतदेह सापडला.

नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सोळा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. शहराजवळ असलेल्या दत्त मंदिर परिसरात झोला रोडवरील नवीन प्लॉटिंग झालेल्या भागातील मूर्तीकार हिरामण पवार यांचा मुलगा करण हिरामण पवार (वय, 14) हा बुधवारी सायंकाळी घरापासून जवळच असलेल्या शेतातील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी बादली घेऊन गेला होता. त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला.

ही बाब त्याच्या सोबत असलेल्या लहान भावाने आरडाओरड करून आईला सांगितली. ही आरडाओरड ऐकूण विहिरीजवळ मोठा जमाव दाखल झाला. सत्तर फूट खोल असलेल्या विहिरीतील पाण्यात केवळ प्लास्टिकची बादली तरंगत असल्याचे दिसल्याने पवन मुरकुटे, सचिन झोलकर, विकास मुरकुटे, दत्ता मुरकुटे आदी तरुणांनी विहिरीत उड्या मारून मुलाचा शोध घेतला, मात्र विहिरीत प्रचंड प्रमाणात असलेल्या पाण्यामुळे रात्र होईपर्यंत त्याचा शोध लागला नाही. या घटनेची माहिती समजल्याने घटनास्थळी आलेल्या बिट जमादार वसंत निळे, पो.शि. मुक्तार पठाण यांनी वीज वितरण कंपनीचे भसारकर गिरी यांना संपर्क साधून विजेची व्यवस्था करून देण्याची विनंती केली. यानंतर लाईनमन बालाजी मुरकुटे, मझहर पठाण यांनी वीजजोडणी उपलब्ध करून दिल्याने दोन मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसून करण या मुलाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सकाळी चार वाजण्याच्या सुमारास करणचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.