Wed, Nov 21, 2018 07:14होमपेज › Marathwada › गोदावरी नदी कोरडीठाक, भाविकांचे हाल

गोदावरी नदी कोरडीठाक, भाविकांचे हाल

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 05 2018 1:19AMउमापूर : राजेंद्र नाटकर

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे गोदावरी नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शिवाय येथे दशक्रिया विधीसाठी येणार्‍या भाविकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 

राक्षसभुवन येथे राज्य व परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी व दशक्रिया विधीसाठी येतात. येथे आल्यानंतर भाविकांना आंघोळीसाठी व पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे हाल होत आहेत. गोदावरी पात्रात पाणी नसल्याने भाविकांना विकत पाणी घेऊन विधी पार पाडावे लागत आहे.

गोदावरीचा उजवा कालवा वाहत आहे, परंतु त्यातील पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आलेले नाही. राक्षसभुवनच्या वरच्या बाजूस गुळज बंधारा आहे व खालच्या बाजूस शहागड बंधारा आहे. राक्षसभुवनच्या पाच किलोमीटर हा भाग कायम कोरडीठाक राहतो. त्यांमुळे भाविकांचे व ग्रामस्थांचे हाल होऊ लागले आहेत. 

राक्षसभुवन येथे रोज भाविक दर्शनासाठी व दशक्रियासाठी येतात, तसेच अनेक भाविक कावड घेऊन पाणी घेऊन जाण्यासाठी येतात. येथे आता पाणी नसल्याने भाविकांना अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  गोदावरी पात्रात पाणी न सोडल्यास आम्ही आंदोलन करू.  - भाऊसाहेब नाटकर,  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. 

राक्षसभुवन येथे पुढील महिन्यात शनिअमावस्या आहे. यानिमित्त येथे मोठी यात्रा भरते. यात्रेसाठी राज्य व परराज्यातील भाविक येतात. गोदावरी कोरडीठाक झाल्याने भाविकांचे हाल होत आहेत. यासाठी गोदापात्रात पाणी सोडण्यात यावे.  - सुहास चौथाईवाले, अध्यक्ष शनिमहाराज देवस्थान ट्रस्ट, राक्षसभुवन.