Thu, Nov 15, 2018 06:14होमपेज › Marathwada › मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार द्या- जिल्हाधिकारी सिंह

मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार द्या- जिल्हाधिकारी सिंह

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 1:44AMबीड : प्रतिनिधी

प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले सुसंस्कार केले तर आदर्श चांगला समाज निर्माण होईल. त्यामुळे समाजात होणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यास निश्चितच मदत मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी गुरुवारी आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात  केले.

प्रत्येक स्त्री आपल्या मुला मुलींना ठराविक ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी ती सतत त्याला प्रोत्साहित करत असते. समाजात मुलापेक्षा मुलींची संख्या कमी झालेली दिसून येत असल्याने सर्वांनी जागृत होण्याची गरज आहे. शासन बेटी बचाओ बेटी पढाओ या सारखे कार्यक्रम राबवीत असून निश्चितच समाजातील मुलींची संख्या वाढण्यास मदत होईल असे एम.डी. सिंह म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, उपविभागीय अधिकारी गणेश निराळी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार, मनीषा तेलभाते, नायब तहसीलदार, शारदा दळवी यांच्यासह विविध मान्यवर विविध विभागातील महिला, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात नवीन मतदारांना ओळख पत्र व कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निराधार व परितक्त्या महिलांना  धनादेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले, तसेच उत्कृष्ट काम करणार्‍या बीएलओ महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश निराळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गिराम व अश्विनी पवार यांनी केले तर आभार नायब तहसीलदार शारदा दळवी यांनी मानले.