Wed, Aug 21, 2019 19:09होमपेज › Marathwada › विक्रमी उत्पादन असलेल्या गेवराईला डच्चू

विक्रमी उत्पादन असलेल्या गेवराईला डच्चू

Published On: Aug 30 2018 1:20AM | Last Updated: Aug 30 2018 1:20AMगेवराई : विनोद नरसाळे

राज्याच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील 18 जिल्ह्यामधील 115 तालुक्यांना कापूस उत्पादन तालुके म्हणून घोषित केले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश केला आहे, मात्र यामधून गेवराई तालुका वगळला असल्याने वस्त्रोद्योग विभागाच्या या धोरणाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ज्या पाच तालुक्याचा कापूस उत्पादक तालुके म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या तुलनेत गेवराई तालुक्यात चार-पाच पट कापूस उत्पादन होत आहे. 

निवड झालेल्या तालुक्यात वर्षाला किमान 9 हजार 600 टन कापूस उत्पादन होत असल्याचा निकष लावण्यात आल्याचे सांगण्यात येते, दरम्यान गेवराई तालुक्यात दरवर्षी 70 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. त्यातच गतवर्षी बोंडआळी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव असतानाही 58 हजार 900 टन कापसाचे उत्पादन झाले. यावरून शासनाने कोणत्या आधारे गेवराईला वगळले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दोन-तीन सुतगिरणीची आवश्यकता

गेवराई तालुक्यात यापूर्वी एक सहकार तत्वावर चालणारी एक सुतगिरणी आहे. त्यामुळे ही सुतगिरणी असल्याचा निकष लावून जर गेवराई तालुक्याला जर वगळले असेल तर हा निर्णय अन्यायकारक ठरणारा आहे. कारण गेवराई तालुक्यात आजमितीला इतर तालुक्याच्या तुलनेत चार पट कापसाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या ठिकाणी अजून किमान दोन-तीन सुतगिरणीची आवश्यकता असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

गेवराई येथे कापूस उत्पादन विक्रमी होत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात देखील येथील कापूस विक्रीसाठी जात आहे. येथील मार्केट कमिटीत देखील दरवर्षी 6 लाखांच्या आसपास कापसाची खरेदी होते, तसेच शेतकर्‍यांना भाव मिळावा यासाठी येथील भाजपचे आ.लक्ष्मण पवार यांनी खासगी मार्केट कमिटी स्थापन केली आहे.