होमपेज › Marathwada › बंद खोलीत सर्वसाधारण सभा 

बंद खोलीत सर्वसाधारण सभा 

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:27PMपरभणी : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विकास कामांसाठी किती निधी आला, याविषयी सदस्य आपले मत सर्वसाधारण सभेत मांडतात. पण ही माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचू नये याची काळजी घेत बुधवारी (दि.20) दुपारी 3 वाजता नेहमी प्रमाणेच एका बंद खोलीत पहिल्यासारखीच परत चर्चा झाली. यात हातपंपावर बसविण्यासाठी सयंत्राचा मुद्दा काही सदस्यांनी सभागृहात उचलून धरल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली. 

जिल्हा परिषदेच्या कै. बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात जि. प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी साडेबारा ही सभा बोलावली होती. पण एका सभापतीच्या निवासस्थानी सदस्यांना मेजवानी दिली गेली होती. याठिकाणी काही महत्वाच्या चर्चेला उधाण आल्याने ही सभा दुपारी पावणेतीन वाजता सुरू झाली. यावेळी उपाध्यक्षा भावना नखाते, सभापती अशोक काकडे, सभापती ऊर्मिला बनसोडे, सभापती राधाबाई सूर्यवंशी, सभापती श्रीनिवास मुंडे, सीईओ बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्‍त सीईओ विजय मुळीक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर आदी उपस्थित होते, दरम्यान सभेत प्रथम मागील इतिवृत्तांतावर चर्चा झाली. यानंतर हातपंपावरील सयंत्राचा प्रश्‍न चांगलाच गाजला. यावेळी गटनेते अजय चौधरी, समशेर वरपुडकर, गटनेते श्रीनिवास जोगदंड आदींनी विविध विषयांवर चर्चा केली.  

अशी होती बुधवारच्या सभेची विषयसूची

सभेत मागील सभेचा कार्यवृत्तांत कायम करणे, शासकीय परिपत्रकाचे वाचन, प्रश्‍नोत्तराचा लेखी तास, आरोग्य विभागाचा लेखा परिक्षण अहवाल सन 2016-17 प्रथम अनुपालन सादर करण्यात मान्यता प्रदान करणे, बृहत आराखड्यांतर्गत नव्याने मंजूर सेलू तालुक्यातील मौजे चिकलठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासस्थान बांधकाम चिकलठाणा बु.येथील कामास सुधारीत (वाढीव) प्रशासकीय मान्यता मिळणे, सेलू तालुक्यातील डासाळा येथील ग्रामपंचायतचे व्यापारी संकुल व इमारत बांधकामासाठी जिल्हा ग्रामीण विकास निधीतून कर्ज मिळणे, पाथरी तालुक्यातील उमरा ग्रा. पं. मध्ये व्यापारी संकुल व इमारत बांधकामासाठी जिल्हा ग्रामीण विकास निधीतून कर्ज मिळणे, संगणक, प्रिंटर्स, संगणक टेबल व इतर अनुवंशिक साहित्य कार्यालयातील संगणीकरण करण्याकरिता खरेदी करणे असे विषय ठेवले होते.  

सत्ताधार्‍यांना पत्रकारांचे वावडे

सर्वसाधारण सभेत पत्रकारांना सभागृृहात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विरोधी सदस्य डॉ. सुभाष कदम व श्रीनिवास जोगदंड यांनी केली. पण जागा अपुरी असल्याने त्यांना प्रवेश देता येत नाही असे उत्तर अध्यक्षांनी सभागृहात सदस्यांना दिले.  

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अनागोंदीचाही पडदा फ्लॅश

जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शासन नियमावलीतून रस्ते करणे बंधनकारक होते. यात अनेक प्रकारची नियमावली ठरली होती. पण याला दुजोरा देत गंगाखेड तालुक्यात तब्बल 15 किमी अंतराचे या योजनेतील रस्ते नियम डावलून झाल्याचा आरोपही सभेत डॉ.सुभाष कदम यांनी केला.

वाघाळा येथील वैद्यकीय अधिकारी बदली प्रकरण

वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंत्रालय स्तरावरील बदलीनुसार वैद्यकीय अधिकारी म्हणून राजूरकर यांना एक महिन्यापूर्वी नियुक्‍ती मिळाली. त्यांनी आठ दिवस दवाखान्यासाठी काम केले आणि त्यांची तत्काळ दैठणा आरोग्य केंद्रात बदली का केली? अशी विचारणा जि. प. सदस्या वसुंधराबाई घुंबरे यांनी केली.