Mon, May 27, 2019 06:49होमपेज › Marathwada › गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीचे ज्ञान दिले

गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीचे ज्ञान दिले

Published On: Jan 29 2018 1:41AM | Last Updated: Jan 29 2018 12:16AMअंबाजोगाई : प्रतिनिधी

तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण विश्‍वाला व्यापणार्‍या धम्मातून दुःख मुक्तीचे ज्ञान दिले असे धम्म विचार भन्ते उपगुप्त महाथेरो यांनी व्यक्त केले.परळी तालुक्यातील मौजे चांदापूर येथे आयोजित चौथ्या बौद्धधम्म परिषदेत ते  बोलत होते.   

चौथ्या धम्म परिषदेची सुरुवात पंचरंगी धम्मध्वजारोहणाने झाली. या धम्म परिषदेला भन्ते उपगुप्त महाथेरो (पुर्णा), भदन्त महाविरो (काळेगाव), भदन्त पय्यानंद (लातूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी, चांदापूर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.या धम्म परिषदेला धम्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले या होत्या. या धम्म परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.जर्रा काझी तर परिषदेच्या अध्यक्षस्थानी नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे (अंबाजोगाई) हे होते. यावेळी धम्मपीठावर अ‍ॅड. अनंतराव जगतकर, प्रा. प्रदीप रोडे,  सचिन कागदे, प्रा.विनोद जगतकर, अशोक तांगडे, प्रा.राम गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना राजेंद्र घोडके यांनी बौद्ध धम्म भारतभर वाढावा यासाठी आपण पुढील काळात यथाशक्ती प्रयत्न करणार असल्याचे सांगून या ठिकाणी लवकरच विपश्यना सेंटर सुरू करीत असल्याची माहिती घोडके यांनी दिली. तर अध्यक्षीय समारोप चंद्रशेखर वडमारे यांनी केला. 

उत्कृष्ट नियोजन

संयोजन समितीने चांदापूर येथील चोखोबाच्या उंच माळावर या धम्म परिषदेची जय्यत तयारी केली होती. पिण्याचे शुध्द व थंड पाणी, आल्पोपहार,  चहाचीही चोख व्यवस्था करण्यात आली. पुस्तक, ग्रंथ विक्रीचे स्टॉलही होते. भव्य शामियाना, उपासक, उपासिका यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. प्रशस्त धम्मपीठ लक्ष वेधून घेत होते. वसंतनगर तांडा रस्त्यापासून वृध्द, अपंग व महिला यांना जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.