Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Marathwada › गंगाखेडात उपनगराध्यक्षांवर अविश्वासाचे सावट

गंगाखेडात उपनगराध्यक्षांवर अविश्वासाचे सावट

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:53PMगंगाखेड : महालिंग भिसे

नगर परिषदेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींनी वेग घेतला असून या कामी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. काँग्रेस-रासप-शिवसेना व घनदाट मित्रमंडळ युतीच्या सत्ताधारी गटातून रासपाला या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने सत्तास्थानातून बाहेर काढण्याची ही एक राजकीय चाल असल्याचे बोलले जात आहे.

दीड वर्षापूर्वी पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासह आठ नगरसेवक निवडून आणत सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन केली.या सत्ता स्थापनेत काँग्रेसने रासपाचे तीन, शिवसेनेचे दोन व माजी आ.सीताराम घनदाट मित्रमंडळाचा एक अशी आघाडी करून बहुमत सिध्द केले. या राजकीय घडामोडीत रासपाचे नेते डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपनगराध्यक्ष पदाची मागणी केली. उपनगराध्यक्षपदी राधाकिशन शिंदे यांची वर्णी लावण्यात डॉ.गुट्टे यशस्वीही झाले. परंतु काही महिन्यातच नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया व उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्या कार्यपध्दतीबद्दल सत्ताधारींसह विरोधी पक्षातील नगरसेवकांत नाराजी वाढू लागली. उपनगराध्यक्ष शिंदे यांच्यावरील  सत्ताधारी व विरोधी गटातून असलेली नाराजी . दैनंदिन कामकाजात वाढलेला हस्तक्षेप, शहरातील मध्यवस्तीत बांधण्यात आलेल्या अनधिकृत दुकानांचे बांधकाम यामुळे अन्य नगरसेवकात नाराजी दिसत आहे.

या नाराजीची राजकीय संधी विरोधक म्हणून राष्ट्रवादी व भाजपाचे नगरसेवक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी एकत्र येऊन सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांच्या मदतीने उपनगराध्यक्ष शिंदे यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी दोन ते तीन बैठका पार पडल्याची देखील माहिती आहे. उपनगराध्यक्षांवरील अविश्वास आणण्यासाठी व तो पारित करण्यासाठी लागणार्‍या कायदेशीर पूर्ततेची माहिती थेट मंत्रालयातून उपलब्ध करून घेतली जात आहे.सद्यःस्थितीत उपनगराध्यक्ष शिंदे यांच्यावरील अविश्वासाची चर्चा हा एक मोठा राजकीय विषय झाला आहे. 

Tags : Marathwada, Gangakhed, sub inspector, faces, unbelief