होमपेज › Marathwada › शिरडशहापूर येथील जय हनुमान मित्र मंडळाचा उपक्रम, अभ्यासिकेसह स्पर्धा परीक्षेला प्राधान्य

गणेशोत्सव वाचनातून साजरा करणार

Published On: Sep 07 2018 1:21AM | Last Updated: Sep 07 2018 1:14AMकुरुंदा ः प्रतिनिधी

आगामी येणारा गणेशोत्सव हा नाचून नव्हे तर वाचून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जय हनुमान मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. तसेच या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले असून सुमारे अकरा हजार रूपयांची बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.

वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलिस ठाणे अंतर्गत शिरडशहापूर हे गाव येते. येथील गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जय हनुमान मित्र मंडळाने आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा नाचून नव्हे तर वाचून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे अकरा हजार रूपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेेत. गणेश उत्सवाच्या दहा दिवसात अत्याधुनिक अभ्यासिकेची निर्मिती केली जाणार असून त्याची प्रत्यक्ष सुरूवात गुरूवारी (दि.13) सकाळी 9 वाजता केली जाईल. अभ्यासिका सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत चालु राहिल. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे दर्जेदार साहित्य पुरविले जाणार आहे. मुलींची स्वतंत्र व्यवस्था केली असून त्यांच्यासाठी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत राहिल. 

तसेच दहा दिवस अभ्यासिकेत पुरविण्यात आलेल्या अभ्यासाच्या साहित्यातून शंभर योग्य प्रश्‍नांची निवड परिक्षेकरिता करण्यात येईल. परिक्षेकरिता दोन तास वेळ देण्यात येवून शंभर प्रश्‍न शंभर गुणाकरिता असतील. एमपीएससी व इतर सर्व स्पर्धा परिक्षांच्या धरतीवर प्रश्‍नपत्रिका व उत्तर पत्रिकांची निर्मिती करण्यात आली आहे. परिक्षेत गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाचे साहित्य बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. पाच स्पर्धकांचा निवड उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी करण्यात येईल. परिक्षा रविवारी (दि.23) सकाळी 9 ते 11 या वेळात घेतली जाणार असून सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर करून लगेचच बक्षीस वितरण केले जाणार आहे. युवकांनी सामाजिक बांधीलकी जोपासत समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर दिला आहे.