Thu, Jul 18, 2019 00:01होमपेज › Marathwada › ग्रामीण भागातील खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर

ग्रामीण भागातील खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर

Published On: Feb 05 2018 2:05AM | Last Updated: Feb 04 2018 10:50PMपालम : प्रतिनिधी

परंपरेने चालत आलेले ग्रामीण खेळ आता नावापुरतेच उरले आहेत. यामध्ये मल्लखांब, कबड्डी, खो-खो, सूरपाट्या, विटीदांडू यांसारखे विविध ग्रामीण खेळ दिवसेंदिवस  ग्रामीण भागातूनही हद्दपार झाल्याचे चित्र दिसत आहे.

शहरीकरणाच्या कचाट्यात मैदानी खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मागील अनेक वर्षांपूर्वी शहराऐवजी ग्रामीण भागात हे खेळ पहावयास मिळायचे; परंतु आता ही परिस्थितीदेखील बदलली आहे. शाळेच्या मैदान अथवा घरासमोर जागेत चेंडू आणि बॅटने क्रिकेट खेळणार्‍यांचे प्रमाण जास्त झाले आहे. शहरी भागात मैदानी खेळापेक्षा इतर खेळाला आधिक महत्त्व दिले जात आहे.

बहुतेक विद्यार्थी बुद्धिबळ, कॅरम, मोबाइल या खेळांकडे वळलेले आहे. संगणकीकरणाच्या युगात संगणकावरील खेळ हा मुलांमध्ये अवडीचा विषय आहे. मैदानी खेळांमध्ये क्रिकेट वगळता अन्य खेळ खेळताना पाहावयास मिळत नाही; परंतु फुटबॉलसारख्या खेळात रस असणार्‍यांची संख्या कमी नाही. शहरी भागातील या आवडी-निवडी आता ग्रामीण भागातही पोहोचल्या आहेत. एका लाकडापासून तयार केलेली विटी आणि दांडू याद्वारे खेळला जाणारा विटी-दांडू हा खेळ सध्या कालबाह्य झाला आहे, तर कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ फक्‍त शालेय, महाविद्यालयीन   स्पर्धांपुरते मर्यादित असल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड ग्रामीण भागातही मोठ्या वृक्षांच्या र्‍हासास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सूर-पारंब्यासारखे खेळ कोठे दिसत नाहीत.

झाडावर चढून खेळला जाणारा हा खेळ जुन्या काळात प्रसिद्ध होता. नव्या पिढीला या खेळाविषयी माहिती आहे की नाही? अशी शंका आहे. तालुक्यात पेंडू, चाटोरी या ठिकाणी  यात्रेनिमित्त कुस्तीचा फड मात्र दिसत आहे. अनेक ठिकाणी कुस्तीचे आखाडे पाहावयास मिळत आहेत. तालुक्यात अल्प प्रमाणात का होईना कुस्ती स्पर्धेत यात्रेेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जात आहेत. कबड्डी, खोखो यांसारखे खेळ ग्रामीण भागात तग धरून आहेत.