Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Marathwada › अब तुम्हारे हवाले वतन साथीयों..

अब तुम्हारे हवाले वतन साथीयों..

Published On: Apr 06 2018 2:21AM | Last Updated: Apr 06 2018 1:29AMपरभणी : प्रतिनिधी

शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांच्यावर 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथे विराट जनसमुदायांच्या साक्षीने अमर रहे अमर रहे शहीद शुभम अमर रहेच्या जयघोषात साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान शुभम यांचे वडील सूर्यकांत मुस्तापुरे यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रीतीनुसार अंत्यविधी केला. तत्पूर्वी पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच सैन्य दलाच्या औरंगाबाद स्टेशन हेडक्‍वॉर्टरच्या 9 सैनिकांच्या तुकडीनेही रीतसर बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी दोन्ही तुकड्यांच्या बँड पथकांनी शोक धून वाजवली. तिरंग्यामध्ये शहीद शुभमचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. 

शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यसंस्कारवेळी शासनाच्या वतीने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी शहीद शुभम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तसेच आ. डॉ. राहुल पाटील, आ. डॉ. मधुसूदन केंद्रे,  आ. मोहन फड, तसेच अप्पर पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी शोकाकूल वातावरणात पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात 3 एप्रिल रोजी भारतीय जवान शुभम मुस्तापुरे शहीद झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी संध्याकाळी विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले. काही काळ छावणी परिसरात सैन्य दलाच्या वतीने अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. 5 एप्रिल रोजी पहाटे पार्थिव चाटोरी या गावी आणण्यात आले. तेथून शोकाकूल वातावरणात गावकर्‍यांनी कोनेरवाडी येथे पार्थिव आणले. त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतले. याप्रसंगी कोनेरवाडीसह इतर नागरिकांना अश्रू अनावर झाले होते. 

पालकमंत्र्यांची अंत्यविधीस दांडी ः परभणी जिल्ह्याचा वीर देशाच्या सीमेवर शत्रूशी दोन हात करताना वीरमरण आले. या घटनेने अवघा परभणी जिल्हा शोकसागरात बुडालेला असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील मात्र यावेळी अनुपस्थित राहिल्याने उपस्थितांत संतापाची लाट दिसली. या वेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित राहून शासनाचे प्रतिनिधित्व करावयास पाहिजे होते, असा सूर उपस्थितांत उमटत होता. काहींनी पालकमंत्री हे झेंडावंदनापुरतेच मर्यादित राहिल्याची खोचक प्रतिक्रिया दिली.

शासन मुस्तापुरे कुटुंबीयाच्या पाठिशी- बबनराव लोणीकर

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनुपस्थितीत शासनाचे प्रतिनिधित्व राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा भाजप जिल्हा संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. शासनाच्या वतीने श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्र शासन शहीद शुभम मुस्तापुरे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, मुस्तापुरे कुटुंबाच्या दुःखात शासन सहभागी असून कुटुंबाची यापुढील सर्व जबाबदारी शासन उचलेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.