होमपेज › Marathwada › हुतात्मा स्मारकांसाठी निधी मंजूर

हुतात्मा स्मारकांसाठी निधी मंजूर

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 12:58AMपरभणी : प्रतिनिधी

स्वातंत्र्य चळवळीत स्वतःच्या प्राणाची आहुती देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची आठवण जागती ठेवून भावी पिढीला पे्ररणा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दयनीय अवस्था होत असल्याने राज्य शासनाने त्यांच्या विकासासाठी पावले उचलली आहेत. यासाठी वित्तीय वर्ष 2018-19 मध्ये विशेष तरतूद करून परभणी जिल्ह्यातील 5 हुतात्मा स्मारकांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी 35 हजार रुपये निधी मंंंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली.

सेलू, जिंतूर, पाथरी, चारठाणा (ता. जिंतूर) व चिकलठाणा (जि. सेलू) येथे हुतात्मा स्मारकांची उभारणी करण्यात आलेली आहे. यापैकी चिकलठाणा येथील स्मारकासंदर्भात भूसंपादन विभागाकडून न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. यामुुळे या हुतात्मा स्मारकाचा निधी वापरण्यात येत नाही; परंतु सन 2016-17 मध्ये शासनाकडून मिळालेल्या 43 लाख 28 हजार रुपयांच्या निधीपैकी पाथरी येथील हुतात्मा स्मारकासाठी 10 लाख 70 हजार तर सेलू, जिंतूर, चारठाणा येथील स्मारकांसाठी 10 लाख 86 हजार रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. यातून स्मारकांचा जिर्णोधाराचे काम करण्यात आले आहे. सुशोभीकरण आणि डागडुजी आवश्यक ती व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे 2017-18 मध्येही शासनाकडून प्रत्येक 7 लाख 15 हजार 722 रुपये निधी खर्चून ग्रेनाईट बसविणे, बाथरूम, ग्रंथालय, लाईट फिटिंग, हॉल, प्रोजेक्टर, सोलारपंप बसविणे व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे वित्तीय वर्ष 2018-19 मध्ये शासनाने राज्यातील 206 स्मारकांच्या देखभालीसाठी, निरीक्षणाकरिता 20 लाख 60 हजार रुपयांच्या अनुदानास मंजुरी दिली आहे. यात जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश असून यासाठी 35 हजारांच्या निधीतून 4 हुतात्मा स्मारकांच्या देखभालीचे, निरीक्षणाचे काम करण्यात येईल. यासाठी चार स्वयंसेवी संस्थांना हे काम देण्यात आले आहे. संस्थांनी स्मारकात दिवाबत्तीची सोय करावी, झाडलोट, देखभाल, स्मारकाचे पावित्र्य अबाधित ठेवण्याचे कार्य करावे, असे सुचविण्यात आले आहे.