Mon, May 20, 2019 20:59होमपेज › Marathwada › पंपावर जाईपर्यंत होते दरवाढ

पंपावर जाईपर्यंत होते दरवाढ

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:37PMबीड : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या इंधन दरवाढीवर आज नियंत्रण येईल, उद्या येईल अशी भाबडी आशा बाळगणार्‍या सर्वसामान्यांना दररोज दरवाढीचेच चटके बसू लागले आहेत. नोटाबंदी, जीएसटीने वाढलेल्या महागाईत आता इंधन दरवाढीचा तडका बसला असून या सर्व परिस्थितीमुळे सर्वसामान्य वैतागले आहे. सध्या पेट्रोल 86 रुपये तर डिझेल 72 रुपये प्रतिलटर झाले आहे.

इंधनाच्या दरबरोबरच महागाई कमी-जास्त होते अशी परिस्थिती आहे. डिझेलचे दर वाढले की वाहतूक खर्च वाढतो, परिणामी त्या त्या वस्तुंच्या किंमती वाढतात. दोन दिवसांपूर्वीच एसटी महामंडळानेही तूट भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढीचे संकेत दिले आहेत. डिझेल दरवाढीमुळे सर्वच बाबींवर परिणाम होत असून पेट्रोलची दरवाढ घरचा खर्च वाढवत आहे. सध्या प्रत्येक घरात किमान दोन ते तीन मोटारसायकल, स्कुटर आहेत. त्यांचा दररोजचा खर्च साहजिकच वाढणार आहे. किमान एक हजार रुपयांचे पेट्रोल महिनाभरासाठी एका गाडीला लागणार असेल तर तीन गाड्यांचा खर्च तीन हजारावर पोहचल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.

खासगी वाहतूक महागली

ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हे वाहतुकदार आता इंधन दरवाढीचे कारण सांगून जास्तीचे पैसे घेत आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागातून शहरात आणल्या जाणार्‍या मालालाही जास्तीचे भाडे द्यावे लागत आहे.

किचन बजेट कोलमडणार

प्रत्येक महिन्यात घरखर्चासाठी ठराविक रक्कम ठेवलेली असते. आता इंधन दरवाढीमुळे भाजीपाला वाहतूक खर्च, दुधाचे दर वाढण्याची शक्यता असून यामुळे किचनचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. यातच गॅसचे दर वाढण्याचे अंदाज व्यक्त केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.