Fri, Apr 26, 2019 15:31होमपेज › Marathwada › गळक्या एसटीपासून होणार सुटका

गळक्या एसटीपासून होणार सुटका

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 9:54PMपरभणी : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नेहमीच पावसाळ्याच्या हंगामात गळत असतात. यात बहुतांश वेळी महिलांसह इतर प्रवाशीही भिजलेले आहेत. याची जाणीव ठेवून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता नवीन फर्मान काढले आहे. यात जर प्रवाशी भिजला तर संबंधित यांत्रिक कामगारास घरी पाठवण्यात येणार असून याबाबतचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत. 

बसचे छत गळून प्रवाशी भिजल्यास कामगारांना निलंबित केले जाणार आहे. तसेच अधिकार्‍यांचीही खातेनिहाय चौकशी होणार असल्याचे आदेशात म्हटलेले आहे. संबंधित आगारातून बाहेर पडलेली कुठलीही बस गळकी असल्यास सदरील कारवाई होणार आहे. परभणी जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थतेतील बसेस राज्यमहामार्गासह इतर ग्रामीण भागातील रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये बहुतांश बस या गळक्या असल्याचे पावसाळ्यातील परिस्थितीवरून पहावयास मिळत आहे. अनेक बसमध्ये तर प्रवाशांना पाऊस पडत असताना बसण्यासाठीही जागा शिल्‍लक राहिलेली नसते. तसेच पावसाच्या पडणार्‍या टिपटिप थेंबात प्रवाशांना आपला प्रवास पूर्ण करावा लागत असल्याचे वास्तव अनेक मार्गांवर पहावयास मिळत आहे. अशाच प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील दोन कामगारांना निलंबति करण्यात आले असून कार्यशाळा अधीक्षकांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. महामंडळाच्या बस बांधणीमध्ये मागील काही वर्षांपासून अनेक दोष असल्याच्या बाबी पुढे येत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कुठल्या बसेस गळतात? याची तपासणी करून त्यावर डांबर टाकून गळती थांबविण्याचे प्रयत्न केले जातात. परभणी विभागांतर्गत असलेल्या परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, हिंगोली, कळमनुरी, वसमत या 7 आगारांतून तब्बल 387 बसेस दररोज सर्वच मार्गांवर धावतात. त्यामुळे नव्या आदेशाचा लाभ प्रवाशांना होईल की नाही? याबद्दल शंकाच आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गळतात बस:  महामंडळाच्या बसेस राज्य महामार्गासह इतर रस्त्यांवरून धावतात, पण राज्य महामार्गाची सध्याची स्थिती एवढी भयावह झाली आहे की, गळकी एसटी दुरुस्त करून रस्त्यावर आणल्यानंंतर जागोजागी असलेल्या खड्ड्यांत गेली की ती परत गळते. अशा प्रकारामुळे परिवहन मंत्री हे नेमके कोणाला जबाबदार धरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.