Sun, May 26, 2019 19:51होमपेज › Marathwada › मित्रांना पाजली ७० हजारची दारू, बिलासाठी पत्‍नीचा छळ

मित्रांना पाजली ७० हजारची दारू, बिलासाठी पत्‍नीचा छळ

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:31PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लग्‍नात मित्रांना ७० हजार रुपयांची दारू पाजली. त्याचे बिल तुझ्या वडिलांनी का दिले नाही, असे म्हणून पतीने तिसर्‍या दिवसांपासूनच पत्नीचा छळ सुरू केला. या प्रकरणात सासरच्या दहा आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हरजीतसिंग सुरेंद्रसिंग सोडी (पती), जगजीतसिंग सुरेंद्रसिंग सोडी, सुरेंद्रसिंग गुरुबक्ष सोडी, विजय ओमप्रकाश आनंद, वेधप्रकाश लोंगानी, सागर केवलप्रसाद मेहरा (सर्व  रा. शगुन अमित बँक कॉलनी, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर) आणि चार महिला अशा दहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. हे कुटुंबीय अहमदनगरचे राहणारे असून त्यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तसेच, हरजितसिंग हा पुण्याला कंपनीत इंजिनिअर आहे.

या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय पीडितेने मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दिली. तिचे वडील एन-२, विठ्ठलनगर भागात रहातात. तिचे २७ मे २०११ रोजी अहमदनगर येथील हरजितसिंग सोडी याच्यासोबत लग्‍न झाले. मोठ्या धुमधडाक्यात झालेल्या या लग्नावेळी हरजितसिंग याने मित्रांना मनसोक्‍त दारू पाजली. त्याचे जवळपास ७० हजार रुपये बिल झाले. हे बिल तुझ्या वडिलांनी का दिले नाही म्हणून हरजितसिंग याने लग्‍नाच्या तिसर्‍या दिवसापासूनच पत्नीला टोमणे मारण्यास सुरूवात केली. सासरच्या इतर मंडळींनीही त्याच्याच सुरात सूर मिसळविला. सोबतच आरोपींनी विवाहितेकडे ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी माहेरहून २५ लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला. त्यास पीडितेने नकार दिल्यावर आरोपींनी तिला मारहाण केली. तसेच, वेगवेगळी घरगुती कारणे काढून त्यांनी तिचा छळ सुरू केला. सात वर्षे या छळातच पीडितने संसार केला. 

गर्भलिंग चाचणी करण्यासाठी धमकावले

दरम्यान, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपी हजजितसिंग याने तिला गर्भलिंग चाचणी करण्यास सांगितले. मुलगी असेल तर नको, आपल्याला मुलगा हवा, असे तो तिला म्हणाला. त्याला पीडितेने नकार दिल्यावर हरजितसिंग याने तिला मारहाण केली. विशेष म्हणजे, पीडितेचे वडील तिला आणण्यासाठी गेले असता परत येथे आले तर तुमच्या कुटुंबाला गायब करू, अशी धमकी सासरच्या लोकांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.